Pune News: पुणे पोलिसांनी पाच अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर पुणे विद्यापीठात एका 19 वर्षीय तरुणास 'लव्ह जिहाद'च्या (Love-Jihad) आरोपावरुन मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठ परिसरात एक तरुण आपल्या दोन वर्गमैत्रिणींसोबत रविवारी (7 एप्रिल) सायंकाळी थांबला होता. या वेळी त्याच्यासोबत अज्ञातांकडून मारहाणीची घटना घडली. सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु असल्याचेही पोलीस म्हणाले.
आरोपींकडून तरुणास मारहाण
पोलिसांनी माहिती देताना पुढे सांगितले की, पीडित तरुणाने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. त्याने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दोन मैत्रिणींसोबत जेवण करुन परतत असताना पुणे विद्यापीठ परिसरात दुचाकीवरुन आलेल्या चार-पाच अनोळखी तरुणांनी आपणास रोखले. या तरुणांनी त्यास त्याचे नाव, पत्ता विचारला. ओळख सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड मागितले. आपल्याकडे नावाबद्दल खोदून माहिती विचारली. आपण आपले नाव सांगितल्यानंतर या तरुणांनी आपणास मारहाण केली. आपण त्यांना मारहाणीचे कारण विचारले असता त्यांनी आपल्यावर 'लव्ह जिहाद' करत असल्याचा आरोप केला आणि अपमानास्पद भाषा वापरुन शिवीगाळ केली. दरम्यान, त्याने स्थानिक पोलीस स्टेशन गाठून शिवीगाळ केली. (हेही वाचा, Bhartiya Nyay Sanhita: लव्ह जिहादविरोधात केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; ओळख लपवून लग्न करणाऱ्याला होणार 10 वर्षांचा कारावास)
विवध कलमांतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 323, 504, 506 आणि इतर संबंधित कलमान्वये अज्ञात पाच इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेतली असून तपास सुरु केला आहे. विद्यापीठ प्रशासनही या प्रकरणानंतर सतर्क झाले असून एक समिती स्थापन करुन सदर प्रकरणातील तथ्य शोधणार असल्याचे समजते.
पुणे विद्यापीठात घडलेल्या सदर कथीत घटनेनंतर जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. पुणे शहर आणि जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या प्रकरणाचा वापर राजकीय मंडळींनी सोईस्करपणे सुरु केला आहे. नेमके काय घडले याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस तपासामध्ये या प्रकरणाती तथ्य आणि सत्य पुढे येऊ शकणार आहे. दरम्यान, राजकीय मंडळींनी मात्र या मुद्द्याचा वापर करत वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक सलोख्यास प्राधान्य देणाऱ्या मंडळींकडून या प्रकरणाचा तटस्त तपास होणे आवश्यक असून, समाजातिक कोणत्याच घटकाने विनाकारण या प्रकरणाचा समाजमन भडकविण्यासाठी वापर केला जाऊ नये असे अवाहन केले आहे.