गोव्यात लॉकडाउनमुळे गुन्हेगारीचे प्रकार 67 टक्के तर ड्रग्स जप्तीचे सुद्धा प्रमाण घटले, एसीपी स्पेशल ब्रांच शोबीत सक्सेना यांची माहिती
तर गोवा (Goa) हे राज्य हे कोरोनामुक्त झाले असले तरीही तेथे लॉकडाउनच्या नियमाचे पालन केले जात आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर गोवा (Goa) हे राज्य हे कोरोनामुक्त झाले असले तरीही तेथे लॉकडाउनच्या नियमाचे पालन केले जात आहे. तेथे अद्याप रेस्टॉरंट, बार, नाइट लाइफ, ब्युटी पार्लर-मसाज पार्लससह अन्य गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. याच दरम्यान आता गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ 67 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच ड्रग्ज जप्तीच्या कारावाया सुद्धा सध्या करण्यात आल्या नाही आहे. कारण सध्या राज्याची सीमा बंद असल्याने कोणत्याही पर्यटकास किंवा नागरिकास येण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटकच नसून ड्रग्सची मागणी सुद्धा कमी झाली असल्याची माहिती एसीपी स्पेशल ब्रांच शोबीत सक्सेना यांनी दिली आहे.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच उर्वरित रुग्णांना सुद्धा 13 एप्रिल पर्यंत घरी पाठवण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसेच गोव्यातील मासेमारीच्या उद्योगाला सुद्धा कोरोना व्हायरसमुळे फटका बसल्याचे एका मच्छिमाराने स्पष्ट केले होते. परंतु गोव्यातील सरकारने मच्छिमारांना मासे विक्रीसाठी काही नियम लागू केले होते. त्यानुसार मत्स विक्री करताना खरेदी करणाऱ्या व्यक्ती आणि विक्रेत्याने गर्दी करुन नये. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासोबत जागेची स्वच्छता सुद्धा राखणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 59,662 वर पोहचला आहे. तर 39834 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 1981 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर सध्या लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार वर्गांना आपल्या जिल्ह्यात परत पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीड लाख कामगारांनी याचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.