Lakhimpur Kheri Violence: मोदीजी हे आपण पाहिले का? प्रियंका गांधी यांचा VIDEO च्या माध्यमातून पंतप्रधानांना सवाल
प्रियंका गांधी यांना लाखीमपूर खीरी कडे जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून 28 तास उलटून गेले तरी त्या पोलिसांच्याच ताब्यात आहेत.
लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri Violence) हिंसाचारावरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रियंका गांधी यांना लाखीमपूर खीरी कडे जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून 28 तास उलटून गेले तरी त्या पोलिसांच्याच ताब्यात आहेत. यादरम्यान, प्रियंका गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. प्रयंका गांधी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया (ट्विटर) अकाऊंटवरही शेअर केला आहे. ट्विटरवरील व्हिडिओत प्रियंका गांधी आणखी एक व्हिडिओ दाखवताना दिसतात. ज्यात घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर कार घालून त्यांना चिरडताना दिसत आहे.
प्रियंका गांधी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मोदीजी नमस्कार! मी ऐकले आहे की, आपण आजादीचा अमृत उत्सव साजरा करण्यासाठी लखनऊला येत आहात. आपण हा व्हिडिओ पाहिला आहे का? ज्यात ज्यात आपल्या सरकारमधील मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना चिरडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहा आणि देशाला सांगा की या मंत्र्याला बडतर्फ का नाही करण्यात आले. माझ्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्याला कोणत्याही ऑर्डरशिवाय कोणत्याही एफआयआर शिवाय ताब्यात कसे घेण्यात आले आहे? शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्ती अजूनही मोकाट कसा आहे? या शेतकऱ्यांनीच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. शेतकरी महिनोनमहीने त्रस्त आहे. आपला आवाज उठवतो आहे. आपण त्याला नाकाराता आहात. माझा आपल्याला आग्रह आहे. आपणही लखीमपूरला या. इथला शेतकरीही देशाचा आत्मा आहे. त्याची वेदना समजून घ्या. त्याची सुरक्षा करणे हाच आपला धर्म आहे. जय हींद.. जय किसान..!' (हेही वाचा, Priyanka Gandhi Vadra Arrested: 'वॉरंट दाखवा मगच अटक करा' उत्तर प्रदेश पोलिसांवर संतापल्या प्रियंका गांधी)
ट्विट
पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना प्रियंका गांधी एका व्हिडिओमध्ये मोबाईलच्या माध्यमातून एक व्हिडिओ दाखवतात. ज्यात शेतकरी घोषणा देत असताना एक गाडी त्यांच्या अंगावर घातली जाते. यात शेतकरी चिरडले जाताना दिसत आहे. लाखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाले आहेत.