Kuwait Fire Tragedy: कुवेत आग दुर्घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विशेष विमानाने भारतात रवाना

दिल्लीला जाण्यापूर्वी विमान सकाळी 11 च्या सुमारास कोची येथे उतरणे अपेक्षित आहे.

IAF aircraft | (Photo Credit - X)

मंगफ शहरात (Mangaf City) दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत (Kuwait Fire Tragedy) मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विशेष विमान कुवेतहून रवाना झाले आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी विमान सकाळी 11 च्या सुमारास कोची येथे उतरणे अपेक्षित आहे. परराष्ट्र मंत्रालयात कनिष्ठ मंत्री म्हणून आपली भूमिका स्वीकारल्यानंतर लगेचच कुवेतला रवाना झालेले गोंडाचे खासदार कीर्तिवर्धन सिंह (Kirti Vardhan Singh) हे देखील या विमानासोबत आहेत.

कुवेतमधील भारतीय दुतावासाकडून तपशील जारी

कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, "कुवेतमधील आगीच्या घटनेत बळी पडलेल्या 45 भारतीयांचे पार्थिव घेऊन जाणारे एक विशेष IAF विमान कोचीसाठी रवाना झाले आहे. कुवेतच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणारे राज्यमंत्री @KVSinghMPGonda, त्वरीत मायदेशी परत येण्याची खात्री देणारे, विमानात आहेत." ऑनलाइन व्हिज्युअल्समध्ये कोचीन विमानतळावर रुग्णवाहिका स्टँडबायवर दिसत आहेत, मृतदेह स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत. (हेही वाचा, Kuwait Building Fire: कुवेतमधील मंगफ परिसरात भीषण आग; अनेक भारतीयांसह 48 लोकांचा मृत्यू, 30 हून अधिक गंभीर जखमी (Watch Video))

आगीच्या दुर्घटनेचा 176 भारतीयांना फटका

मंगफ शहरातील सहा मजली इमारतीला बुधवारी लागलेल्या आगीत किमान 48 जणांचा मृत्यू झाला. तेथे असलेल्या 176 भारतीय कामगारांपैकी 45 मरण पावले आणि 33 रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित कामगार सुरक्षित असल्याची माहिती आहे. बळींमध्ये केरळमधील 23, तामिळनाडूतील सात, उत्तर प्रदेशमधील तीन, ओडिशातील दोन आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणामधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. Kuwait Fire: कुवेतमधील आगीच्या घटनेत मृतांपैकी 12 केरळ नागरिकांची ओळख पटली, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज तातडीने रवाना

जखमी भारतीय कामगारांवर अद्यापही उपचार सुरु

कुवेतमध्ये आल्यानंतर मंत्री सिंह यांनी जखमी भारतीय कामगारांवर उपचार सुरू असलेल्या पाच रुग्णालयांना गुरुवारी भेट दिली. दूतावासाने सांगितले की या कामगारांना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार हळूहळू सोडण्यात येईल. त्यांच्या भेटीदरम्यान, सिंग यांनी उपपंतप्रधान शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांची भेट घेतली, ज्यांनी त्यांना मृतदेह परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

एक्स पोस्ट

मंत्री सिंह यांनी सांगितले की, आगीच्या दुर्घटनेत जळालेले मृतदेहांची ओळख पटणे अतिशय कठीण होते. त्यामुळे ही ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी 48 मृतदेहांची ओळख पटवली, ज्यात 45 भारतीय आणि तीन फिलिपिनो यांचा समावेश आहे, असे अल-सबाहने नमूद केले आहे. या घटनेचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. कुवेतमधील स्थानिक प्रशासन इमारतीत 160 हून अधिक लोक कसे बसले होते याचा तपास करत आहेत.