Krystal Keen on Hiring Agniveers: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! लष्कराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर क्रिस्टल कंपनीत मिळू शकते ताबडतोब नोकरी, जाणून घ्या सविस्तर
कंपनीचे सीईओ संजय दिघे म्हणतात की, काही हुशार अग्निवीरांना नंतर खूप चांगले पगार मिळू शकतात.
Krystal Keen on Hiring Agniveers: 'अग्निवीर योजने'नुसार (Agniveer Scheme) सैन्यात भरती झालेल्या केवळ 25 टक्के लोकांनाच पूर्णवेळ नोकरी मिळेल, तर 75 टक्के लोकांना 4 वर्षांच्या सेवेनंतर परत यावे लागेल. अशात ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यात सेवा केलेल्या सैनिकांना नोकऱ्या देण्यासाठी आता अनेक कंपन्या पुढे येत आहेत. याआधी बुधवारी हरियाणा राज्य सरकारने अग्निविरांसाठी सविस्तर योजना जाहीर केली. आता क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस (Krystal Integrated Services) या कॅम्पसमध्ये सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या कंपनीनेही, अग्निवीर कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.
हरियाणा सरकारने पोलीस, खाण रक्षक आणि इतर अनेक प्रोफाइलमध्ये अग्निविरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर हरियाणा सरकारने त्यांना वयात सवलत आणि सबसिडीही जाहीर केली आहे. अग्निवीरला गट क आणि ड नोकऱ्यांमध्ये वयात 3 वर्षांची सूट मिळेल. आणि क गटात त्यांना 5 टक्के आरक्षण मिळेल. यासह सरकारने अग्निवीरला व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.
आता क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसचे म्हणणे आहे की, सैन्यात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीर दलाच्या जवानांना रोजगार देण्यास ते उत्सुक आहेत. कंपनीचे सीईओ संजय दिघे म्हणतात की, काही हुशार अग्निवीरांना नंतर खूप चांगले पगार मिळू शकतात. त्यांच्या कंपनीसारख्या इतर कंपन्या अग्निवीर आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यात एक चांगला पूल बनू शकतात, जे मोठ्या गुंतवणुकीसह व्यावसायिक परिसराचे रक्षण करण्यासाठी योग्य उमेदवार शोधत आहेत. (हेही वाचा: Stipend for Maharashtra Students: 'लाडकी बहीण' नंतर आता विद्यार्थ्यांसाठी खास योजना; दरमहा 8 आणि 10 हजार रुपये स्टायफंड, घ्या जाणून)
संजय दिघे म्हणाले की, अग्निवीर जवानांना खाजगी क्षेत्रात फायदेशीर रोजगार मिळेल. अशा कलागुणांना खूप मागणी आहे. त्यांना आठवडाभरही निष्क्रिय बसावे लागणार नाही. क्रिस्टलने नुकतीच एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने नियुक्ती केली आहे, ज्यांना त्यांच्या लष्करातील कार्यकाळात अग्निवीर योजना हाताळण्याचा अनुभव आहे. कंपनीमध्ये सध्या 5,800 हून अधिक सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. साधारण 24 वर्षांपूर्वी कार्यालय आणि निवासी संकुलांना सुरक्षा प्रदाता म्हणून, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसची सुरुवात झाली होती.