Kota Student Suicide: कोटा येथे NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जानेवारीपासून कोचिंग करणाऱ्या 12 मुलांनी गमावला आपला जीव

ऋषीतने हे पाऊल का उचलले, याबाबत सध्या काहीच माहिती नाही. खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Kota Student Suicide: राजस्थानमधील (Rajasthan) कोटा (Kota) येथे आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात गुरुवारी एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दादाबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे घरातील एका खोलीत बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी ऋषित नावाच्या विद्यार्थ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दादाबारी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जानेवारीपासून कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याने संशयित आत्महत्येची ही बारावी घटना आहे. 2023 मध्ये कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या 26 होती.

ऋषित हा कोटा शहरात डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. ऋषीतने हे पाऊल का उचलले, याबाबत सध्या काहीच माहिती नाही. खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. दादाबारी पोलीस ठाण्याचे अधिकारी नरेश मीना यांनी सांगितले की, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत पाहिले असता विद्यार्थी पंख्याला लटकलेला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. बुधवारी कधीतरी त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

त्यानंतर त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मृतदेह शवागारात हलवण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना पोलीस ठाण्याचे एएसआय शंभू दयाल म्हणाले की, ऋषित वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. कुटुंबीय कोटामध्ये आल्यानंतर पोलीस शवविच्छेदन करतील आणि कुटुंबीयांच्या अहवालाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करतील. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. याआधी 16 जून रोजी बिहारचा आणखी एक रहिवासी, आयुष जैस्वाल (17) याने कोटा येथील त्याच्या पीजी रूममध्ये आत्महत्या केली आयुष आयआयटी-जेईई स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. (हेही वाचा: Police Lathichar on Indian Youth Congress Protest: NEET मुद्द्यावरून भारतीय युवक काँग्रेसकडून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार)

दरम्यान ऋषितने आत्महत्या केलेल्या वसतिगृहासह इतर अन्य निवासी वसतिगृहात अजूनही प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. खोलीत पंख्याला अँटी हँगिंग उपकरण बसवलेले नव्हते. प्रशासनाकडून रात्रीच्या हजेरीसह अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. असे असूनही ऋषित कोचिंगला जात नसल्याची माहिती वसतिगृह चालकाने दिली नाही. हे वसतिगृह चालवणारे आशिष बिर्ला सांगतात की, वसतिगृहात हँगिंग डिव्हाईस बसवण्याचे काम सुरू होते, मात्र ज्या खोलीत आत्महत्या झाली त्या खोलीत ते बसवण्यात आले नव्हते.