Karnataka CM BS Yediyurappa Tests Positive For Coronavirus: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती स्थिर, रुग्णालयात केले दाखल
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग आता देशातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी किंवा सुरक्षित वातावरणात वावरणाऱ्या व्यक्तींनाही होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) बीएस येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. यासह आपली प्रकृती ठीक असून आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये बीएस येदियुरप्पा म्हणतात, ‘माझी कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत ठीक असून, डॉक्टरांच्या सांगण्यावरून सावधगिरी बाळगून मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी निवेदन करतो की, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी व स्वतःला वेगळे ठेवावे.’ या गोष्टीच्या काही तासांपूर्वीच येडियुरप्पा यांनी अमित शाह कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली होती.
पहा ट्वीट -
जुलै महिन्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या कार्यालय-निवासस्थान ‘कृष्णा’ येथे किमान दहा कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर, स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले होते. याआधी शनिवारी कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी.पाटील व त्यांच्या पत्नीस कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यापूर्वी त्यांच्या जावईलाही कोविड-19 चा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली होती. रिपोर्ट्स सकारात्मक आल्यावर ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. (हेही वाचा: अमित शाह यांना कोरोना विषाणूची लागण, रुग्णालयात दाखल; राहुल गांधी यांनी व्यक्त केली लवकर बरे होण्याची इच्छा)
येदियुरप्पा यांच्या आधी आज बऱ्याच राजकारणी लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. सध्या ते गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनीही शहा यांची भेट घेतली होती त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये गेले आहेत. सुप्रियो लवकरच स्वतःची कोविड-19 ची चाचणी करुन घेतील. त्याच वेळी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. रविवारी उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. काल उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले.