K Shivaram Passes Away: के शिवराम यांचे निधन, माजी आयएएस अधिकारी ते अभिनेता, कसा होता प्रवास? घ्या जाणून
ते 70 वर्षांचे होते. बंगळुरु येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आणि त्यासोबत अभिनयातही करीअर करणारे के शिवराम (K Shivaram Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. बंगळुरु येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवा आणि अभिनय अशा दोन्ही आघाड्यांवर समाधानकारक काम केले आणि नावही मिळवले. त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. मात्र, राजकीय आयुष्यात त्यांना तितकी गती मिळाली नाही जेवढी त्यांना नोकरी आणि कलाक्षेत्रात मिळाली.
प्रशासकीय सेवेसोबत अभिनय
कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील उरुगहल्ली येथील ड्रामा मास्टर केम्पैया आणि त्यांची पत्नी चिक्काबोरम्मा यांच्या पोटी 6 एप्रिल 1953 रोजी त्यांचा जन्म झाला. आपल्या एकूण आयुष्यात त्यांनी विविध गोष्टी केल्या. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी केली. अभिनय केला. त्यांनी काही काळ राजकीय क्षेत्रातही प्रवेश केला. पण तेथे ते विशेष रमले नाहीत किंवा त्यांना त्या क्षेत्राच म्हणावी तशी गती मिळाली नाही. ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास फारसा उल्लेखनीय राहिला नाही. मात्र, कन्नडमध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आदराने पाहिले गेले. (हेही वाचा, Pankaj Udhas Dies: प्रसिद्ध गझल गायक पद्मश्री विजेते पंकज उदास यांचे निधन)
नोकरी करत शिक्षण केले पूर्ण
के शिवकुमार यांनी मल्लेश्वरम येथील सरकारी हायस्कूलमधून मॅट्रिक पूर्ण केले. लगोलग त्यांनी टायपिंग आणि शॉर्टहँडचा कोर्सही पूर्ण केला. ते इतक्यावरच थांबले नाही त्यांनी 1972 मध्ये राज्य सरकारमध्ये नोकरी मिळवली. पुढच्या वर्षी, ते पोलिस रिपोर्टर म्हणून पोलिस खात्याच्या गुप्तचर शाखेत रुजू झाले. नोकरी मिळवली असली तरी ते तेवढ्यावर समाधानी राहीले नाहीत. त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवले. नोकरी करत असतानाच त्यांनी संध्याकाळ आणि दूरस्थ शिक्षणातून त्यांनी बीए आणि एमएची पदवी घेतली. 1985 मध्ये, त्यांनी कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. असे असले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. बलपणीच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहिले होते. (हेही वाचा, Poet Munawwar Rana Dies: ह्रदयविकाराच्या झटक्याने उर्दू कवी मुनव्वर राणा यांच निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
UPSC होणारे पहिले कन्नड व्यक्ती
यूपीएससी परीक्षा ते 1986 मध्ये उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिले कन्नड व्यक्ती होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा केंद्रीय सेवेत नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान त्यांनी अभिनयात प्रवेश केला. नागथीहल्ली चंद्रशेकर दिग्दर्शित संगीतमय आणि रोमँटिक थ्रिलर, 1993 च्या हिट 'बा नल्ले मधुचंद्रके' या चित्रपटाने त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. हा चित्रपट चांगला चालला. पण, त्यानंतरचे त्यांचे चित्रपट विशेष चालले नाहीत. परिणामी त्यांनी पुन्हा आपल्या नोकरीकडे लक्ष्य केंद्रीतकेले. सन 2013 मध्ये ते बेंगळुरू प्रादेशिक आयुक्त म्हणून निवृत्त झाले.
नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिथे त्यांचे मन फारसे रमले नाही त्यामुळे लवकरच त्यांनी जेडी(एस) मध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये विजापूरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना भाजपच्या रमेश जिगाजिनागी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्य कार्यकारीणीमध्ये संधी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी वाणी शिवराम आणि कन्नड अभिनेता प्रदीप यांच्याशी विवाहित मुलगी असा परिवार आहे.