जम्मू काश्मीर: हंदवाडा येथील नौगाम सेक्टर मधील LOC जवळ झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; दोन AK-47 जप्त

यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI))

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील हंदवाडा (Handwara) जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये (Nowgam Sector) आज (शनिवार, 11 जुलै) सकाळी एलओसी (LOC) जवळ भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मृत पावलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 (AK-47) आणि इतर आपत्तिजनक वस्तू जप्त करण्यात आल्या. दरम्यान, दहशतवादी सीमारेषेवरुन घुसखोरी करत होते की कोणत्या गावात लपले होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आज सकाळी नौगाम सेक्टरमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून कारवाई करण्यात आली आणि त्यात दोन दहशतवादी मारले गेले.

अलिकडेच नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ अग्निम चौक्यांवर पाकिस्तानकडून कोणतेही कारण नसताना बेशूट गोळीबार करण्यात आला होता. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या हल्ल्याला भारताकडूनही चौख उत्तर देण्यात आले. (जम्मू काश्मीर मधील कठुआ परिसरात आढळलेल्या पाकिस्तानी ड्रोनमधून अनेक शस्त्रात्रं जप्त; मोठा हल्ला करण्याचा मानस- BSF)

ANI Tweet:

या घटनेनंतर भारतीय सेनेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानने 30 जून 2020 रोजी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडा येथील नौगाम सेक्टर मधील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेशूट गोळीबार केला होता. या गोळीबाराला प्रत्त्युतर देण्यासाठी भारतीय सेनेकडूनही गोळीबार करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरजवळील सीमारेषेवर अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले, दहशतवाद्यांची घुसखोरी सातत्याने सुरुच आहे.