Vrindavan ISKCON Temple: कृष्णा जन्माष्टमी 2020 च्या पार्श्वभूमीवर वृंदावनचे इस्कॉन मंदिर झाले सील; पुजाऱ्यासह 22 लोकांना कोरोना विषाणूची लागण
वृंदावन (Vrindavan) मध्ये तर या उत्सवाला विशेष महत्व आहे. मात्र आता या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असलेले दिसून येत आहे.
सध्या देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2020) उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे. वृंदावन (Vrindavan) मध्ये तर या उत्सवाला विशेष महत्व आहे. मात्र आता या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असलेले दिसून येत आहे. उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथील इस्कॉन मंदिराचे (ISKCON Temple) पुजारी यांच्यासह 22 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर मंदिर सील करण्यात आले आहे. मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण मंदिर बंद केले केले. 12 ऑगस्ट रोजी इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा होणार होता.
जन्माष्टमीच्या उत्सवा दरम्यान होणारी गर्दी थांबविण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच मंदिरांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारने लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात केली आहे. या भागामध्ये भाविकांना दर्शनासाठी मंदिरे उघडली आहेत. मात्र मंदिर प्रशासनाने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार मंदिरांमध्ये मास्क घालूनच परवानगी दिली जाणार आहे. तसेच, हात स्वच्छ करणे आणि सामाजिक अंतर पाळणे अशा गोष्टी सुनिश्चित केल्या जातील. मात्र आता इस्कॉन मंदिरातच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने मंदिर सील केले गेले आहे.
एएनआय ट्वीट -
याबाबत बोलताना डॉ. भुदेव म्हणाले, ‘वृंदावनच्या इस्कॉन मंदिरात एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला, त्यानंतर ताबडतोब इतर लोकांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात झाली. यामध्ये आतापर्यंत 22 लोक कोरोना सकारात्मक आले आहेत. त्यानंतर या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध सुरु आहे. लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे व आता मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले आहे.’
(हेही वाचा: रवींद्र जडेजाचा पोलिसांशी मास्क न घालण्याबाबत वाद, महिला शिपायाशी गैरवर्तन केल्याचा आरोप)
अहवालात म्हटले आहे की, इस्कॉनशी संबंधित भक्तिचारु स्वामी यांचे 4 जुलै रोजी फ्लोरिडा येथे कोरोना विषाणूमुळे निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार पश्चिम बंगालमध्ये करण्यात आला. असा दावा केला जात आहे की, इस्कॉन वृंदावनचे बरेच लोक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी पश्चिम बंगालला गेले होते आणि हे सर्व लोक 10-15 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात परतले. आता कोरोना साठी सकारात्मक आलेले दोन लोक हे देखील पश्चिम बंगालला गेले होते.