India's Richest Man: मुकेश अंबानी यांना मागे टाकून Gautam Adani बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जगात 11व्या क्रमांकावर पोहोचले

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत 7 अब्ज डॉलर (52,000 कोटी रुपये) ने घट झाली आहे. अदानी समूहाच्या 6 कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत

अदानी समूह (Photo Credit : Youtube)

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीचा फायदा गौतम अदानी (Gautam Adani) यांना झाला आहे. मंगळवारी, रिलायन्सच्या समभागांमध्ये तीव्र घसरण झाल्यामुळे गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागे टाकले आणि ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. फोर्ब्सच्या रिअल टाइम नेट वर्थ डेटानुसार, अदानी यांची मालमत्ता सध्या सुमारे 6.72 लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. याशिवाय गौतम अदानी हे सध्या जागतिक स्तरावर जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत अदानीची मालमत्ता 5.82 लाख कोटी रुपये होती. 18 जानेवारीला ती वाढून 6.95 लाख कोटी रुपये झाली होती. त्यानुसार 2022 मध्ये अदानीच्या एकूण मालमत्तेत दररोज 6000 कोटी रुपयांची वाढ होत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स दोन दिवसांत 155 रुपयांनी घसरले आहे. संध्याकाळी रिलायन्सचे शेअर्स 2.29% घसरून 2323.05 रुपयांवर ट्रेंड करत होते.

रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 200 रुपयांची घसरण झाली आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत 7 अब्ज डॉलर (52,000 कोटी रुपये) ने घट झाली आहे. अदानी समूहाच्या 6 कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. या वर्षी जानेवारीमध्येच या सर्व कंपन्यांना 5% ते 45% पर्यंत परतावा मिळाला आहे. विशेषतः समूहाच्या ऊर्जा कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. यामध्ये देखील अदानी ग्रीन एनर्जीने 45% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर, जेफ बेझोस दुसऱ्या स्थानावर, Bernard Arnault तिसऱ्या स्थानावर, Microsoft चे सह-संस्थापक बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर लॅरी पेज आणि मार्क झुकरबर्ग यांचा नंबर लागतो.