ISRO च्या GSAT-31 या नव्या उपग्रहाची यशस्वी भरारी
भारताचा नवा संदेशवाहक उपग्रह जीसॅट 31 चे बुधवारी (6/2/2019) च्या पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
भारताचा नवा संदेशवाहक उपग्रह (communication satellite) जीसॅट 31 (GSAT-31) चे बुधवारी (6/2/2019) च्या पहाटे अडीच वाजताच्या सुमारास यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. फ्रेंच गयाना (French Guiana) येथून या उपग्रहाने यशस्वी भरारी घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या 42 मिनिटांत हा उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झाला.
इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन 2535 किलोग्रॅम आहे. जीसॅट 31 हा भारताचा 40 वा संदेशवाहक उपग्रह आहे. याचा कार्यकाळ 15 वर्षांचा असेल. जीसॅट 31 या उपग्रहाचा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस आणि इतर सेवांसाठी होईल. तसंच या उपग्रहाचा बँड ट्रान्सपॉंडर व्यापक असल्याने अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंदी महासागर या समुद्री क्षेत्रात संदेशवहनासाठी मदत होईल. (विद्यार्थ्यांनी बनवलेला जगातील सर्वात हलका उपग्रह 'कलामसॅट'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव)
जीसॅट 31 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी एरियन स्पेस आणि इस्रोचे अनेक अधिकारी जानेवारीपासून फ्रेंच गयाना येथे उपस्थित होते. जीसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतिश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस. पांडियन यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.