Coronavirus: आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारताचा GDP Growth असेल 0 टक्के; Moody's ने वर्तवला अंदाज

लॉक डाऊन (Lockdown) मुळे भारताला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार

GDP | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

शुक्रवारी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody's Investors Service) चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर (Growth Rate) शून्य टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. लॉक डाऊन (Lockdown) मुळे भारताला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. 2020-21 आर्थिक वर्षात भारताची वाढ शून्यावर थांबेल, पण 2022 मध्ये ती पुन्हा वेग पकडेल असा अंदाज आहे. मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठी आशा व्यक्त करत म्हटले आहे की, 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची जीडीपी (GDP) वाढ 6.6 टक्क्यांपर्यंत असू शकते. असे झाल्यास मंदीच्या संकटातून बाहेर पडण्यास भारताला मोठी मदत मिळेल.

मूडीजच्या अंदाजानुसार वित्तीय तूट 5.5 टक्के असेल. यापूर्वी अर्थसंकल्पात भारताच्या अर्थमंत्र्यांनी 3.5 टक्के तूट असल्याचे म्हटले होते. एजन्सीने म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे भारत पूर्णपणे अडचणीत आला आहे आणि यंदा त्याचा परिणाम दिसून येईल. एजन्सीने देशातील मोठ्या वित्तीय तूट, सरकारी कर्ज, कमकुवत सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधा आणि नाजूक वित्तीय क्षेत्राबद्दल भीती व्यक्त केली आहे. मूडीजने म्हटले आहे की, अलिकडच्या वर्षांत भारताच्या आर्थिक विकासाची गुणवत्ता कमी झाली आहे. (हेही वाचा: परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या स्वदेशी परतण्याचा दुसरा टप्पा 15 मे पासून; रशिया, जर्मनी, फ्रान्स, स्पेन समवेत अन्य देशातून परत आणणार)

लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद आहेत, परिणामी कर्जाचे प्रमाण वाढेल असे एजन्सीने म्हटले आहे. दरम्यान, आयएमएफने 2020 मध्ये भारताची अंदाजित जीडीपी वाढ 5.8 टक्क्यांवरून 1.9 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, जागतिक बँकेने 2020-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 1.5 ते 2.8 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. फिचने अंदाज व्यक्त केला आहे की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 0.8 टक्क्यांनी वाढेल, तर एस एंड पीने चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीमध्ये 1,8 टक्क्यांनी वाढ केली आहे.