India's First Underwater Metro: कोलकाता मेट्रोने रचला इतिहास; भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो रेल्वे (Watch Video)

नदीखालून जाण्यासाठी मेट्रोला 60 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागेल. हावडा मैदानापासून एस्प्लानेडला जाण्यासाठी सहा मिनिटे लागतील. एकूण 16.55 किमी मार्गापैकी 10.8 किमी मार्ग भूमिगत आहे. यामध्ये नदीच्या खालच्या भागाचाही समावेश आहे.

India's First Underwater Metro (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बुधवारी देशात पहिल्यांदाच मेट्रो ट्रेन (Metro Rail) एका नदीच्या खालून धावली. भारतात प्रथमच अंडरवॉटर ट्रेन धावली आहे. ही ट्रेन बुधवारी पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या (Hooghly River) पाण्याखालून कोलकाताहून हावडा येथे पोहोचली. मेट्रो रेल्वेचे जीएम पी उदय कुमार रेड्डी यांनी या ट्रेनमधून महाकरण ते हावडा मैदान असा प्रवास केला. ट्रेनने सकाळी 11.55 वाजता हुगळी नदी ओलांडली. हावडा येथे पोहोचल्यावर रेल्वेचे पूजन करण्यात आले.

अशाप्रकारे कोलकातामध्ये चाचणी केली जात असलेली पाण्याखालील मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या पूर्वेकडील एस्प्लानेड आणि पश्चिम किनाऱ्यावरील हावडा मैदान यांना जोडते. हावडा मेट्रो स्टेशन जमिनीपासून 33 मीटर खाली आहे आणि ते देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे.

मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी सांगितले की, हावडा मैदान ते एस्प्लानेड ही चाचणी पुढील सात महिने सुरू राहील आणि त्यानंतर या विभागात नियमित सेवा सुरू होईल. मित्रा पुढे म्हणाले की, मेट्रो रेल्वेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे कारण अनेक अडथळे पार करून हुगळी नदीखाली रेक चालवण्यात आला आहे. कोलकाता आणि उपनगरातील लोकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. बांगला नववर्षानिमित्त भारतीय रेल्वेने बंगालच्या लोकांना दिलेली ही खास भेट आहे.

मेट्रोचे दोन रेक आज कोलकाता येथील एस्प्लानेड स्टेशनवरून हावडा मैदान स्थानकात हलवण्यात आले. हावडा मैदान ते एस्प्लेनेड या 4.8 किमीच्या भूमिगत भागावर लवकरच ट्रायल रन सुरू होईल. मेट्रो 45 सेकंदात हुगळी नदीखालील 520 मीटरचा भाग कव्हर करेल अशी अपेक्षा आहे. हुगळी नदीच्या खाली 520 मीटर दुहेरी बोगद्यांमध्ये बांधलेला हा पाण्याखालील रेल्वे ट्रॅक 4.8 किलोमीटर लांब आहे. हा मेट्रो बोगदा बनवण्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाले आहेत. (हेही वाचा: Rajasthan First Vande Bharat Express: अजमेर - दिल्ली कैंट वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा, राज)

या मेट्रोचा कमाल वेग ताशी 80 किमी असेल. नदीखालून जाण्यासाठी मेट्रोला 60 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागेल. हावडा मैदानापासून एस्प्लानेडला जाण्यासाठी सहा मिनिटे लागतील. एकूण 16.55 किमी मार्गापैकी 10.8 किमी मार्ग भूमिगत आहे. यामध्ये नदीच्या खालच्या भागाचाही समावेश आहे.