Stock Market Updates: भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक, सेन्सेक्स, निफ्टी वधारले

टीसीएस (TCS) , इन्फोसिस आणि विप्रो सारखे 'बिग फिश' वेगाने वाटचाल करु लागल्याने आणि निफ्टी आयटीमध्ये 2.5% ची वाढ पाहायला मिळाली.

Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

Indian Stock Markets News: भारतीय शेअर बाजार गुरुवारी (14 डिसेंबर) मोठ्या तेजीने उघडला. यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्या कामगिरीचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. त्यामुळे बाजार उघडताच सकाळी पहिल्याच सत्रात सेन्सेक्सने (Sensex) 750 अंकांची वाढ करून 70,365 चा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर निफ्टीने (Nifty) 21,000 चा टप्पा ओलांडला. टीसीएस (TCS) , इन्फोसिस आणि विप्रो सारखे 'बिग फिश' वेगाने वाटचाल करु लागल्याने आणि निफ्टी आयटीमध्ये 2.5% ची वाढ पाहायला मिळाली. खास करुन आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे बाजाराला ही वाढ अनुभवता आली.

दरम्यान, आधीच्या सत्रात, देशांतर्गत इक्विटी बाजार माफक वाढीसह बंद झाले. तर इंट्राडे नीचांकीवरून परत आले. फेडरल रिझर्व्हने येत्या वर्षात संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक भावना दिसून आली. सध्याचे दर राखूनही, मध्यवर्ती बँकेच्या "डॉट प्लॉट" ने 2024 पर्यंत दरांमध्ये 75 बेसिस पॉईंट कपातीची अपेक्षा प्रकट केली आहे, सप्टेंबरमध्ये दर्शविल्यापेक्षा अधिक आक्रमक प्रक्षेपण आहे. (हेही वाचा, Stock Market News: सेन्सेक्सने ओलांडला 70 हजारांचा टप्पा, निफ्टीचीही विक्रमाकडे वाटचाल)

 

पहिल्या सत्रातील फायदे तोटे

वधारलेले समभाग

एचसीएल टेक (3.28%); टेक महिंद्रा (3.08%); LTIMindtree (2.88%); इन्फोसिस (2.35%); विप्रो (2.31%)

घसरलेले समभाग

पॉवर ग्रिड (-0.93%); नेस्ले इंडिया (-0.69%); सिप्ला (-0.49%); BPCL (-0.49%); बजाज ऑटो (-0.31%)

IPO बाबत आकर्षण

डोम्स इंडस्ट्रीजच्या ₹1,200 कोटींच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला बुधवारी लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या शेवटी, IPO 5.7 पट ओव्हरसबस्क्राइब झाला. प्रति शेअर ₹750-790 च्या श्रेणीत किंमत असलेला, IPO शुक्रवारी बंद होणार आहे, ज्यामध्ये 18 शेअर्सचा समावेश आहे.

दरम्यान, इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशनच्या ₹1,200 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला 13 डिसेंबर रोजी बोली लावण्याच्या पहिल्या दिवशी 1.48 वेळा सदस्यत्व मिळाले. इश्यूसाठी किंमत बँड ₹469-493 प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. मार्केट लॉट 30 शेअर्स आहे. या आयपीओलाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे.

अलिकडील काही महिन्यांमध्ये खास करुन कोरोना महामारीतील लॉकडाऊनच्या काळाबासून भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढली आहे. खास करुन सामान्य नागरिक ज्याला रिटेल इनव्हेस्टर म्हणून ओळखले जाते. त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अर्थात, सामान्य नागरिकांना गुंतवणुकीची जोखीम आणि साक्षरतेचे भान नसल्याने होणारे तोटेही वाढल्याने सेबीने सावधगिरीचा इशारा दिला आहे.