Sputnik Light Covid Vaccine ला भारतात मान्यता मिळणार? पहा काय म्हणालं Niti Aayog
भारतातील लसीकरण मोहिमेलाही या लसीमुळे गती मिळण्याची अपेक्षा आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संकटात रशियाच्या (Russia) सिंगल डोस (Single Dose) स्पुटनिक लाईट (Sputnik Light) लसीने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेलाही या लसीमुळे गती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सध्या देशात दररोज 4 लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत असून मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.
स्पुटनिक लाईट लसीच्या डेटाचे भारत परिक्षण करेल, असे नीती आयोगाने म्हटले आहे. या लसीचा एकच डोस पुरेसा असल्याचा लस निर्मात्यांचा दावा आहे. "आम्ही या दाव्याचे परिक्षण करत आहोत. यासाठी आम्ही पुरेसा डेटा आणि immunogenicity यांची तपासणी करणार आहोत. त्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतला जाईल," असे नीती आयोगाने स्पष्ट केले. तसंच अधिक डेटाची प्रतिक्षा आहे, असे नीती आयोगाचे सदस्य V K Paul यांनी सांगितले. (रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF)
विशेष म्हणजे लस निर्मात्यांच्या दाव्यात तथ्य असल्यास भारतातील लसीकरणाची गती दुप्पट होऊ शकते, अशी आशाही त्यांनी यावेळी वर्तवली. ते म्हणाले, "सिंगल डोस लस हे अत्यंत आश्वासक आहे. हे प्रोत्साहनवर्धक असून यामुळे उत्साह वाढला आहे. सिंगल डोस लसीमुळे लसीकरणाचा वेग वाढेल. पण आम्ही त्यांच्या डेटा आणि प्रक्रीयेची तपासणी करत आहोत. वैज्ञानिक डेटा आणि माहितीची तपासणी केल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईल," असेही त्यांनी सांगितले.
भारताने यापूर्वी रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला मान्यता मंजूर दिली आहे. मात्र अद्याप ती लस कोणत्याही नागरिकाला देण्यात आलेली नाही. स्पुटनिक व्ही ही लस तीन आठवड्यांच्या अंतराने घेतली जाते. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील antigens मध्ये फरक आहे. हे या लसीचे वैशिष्ट्य मानले जाते. इतर लसींच्या दोन्ही डोसमध्ये antigens सारखेच असतात, असेही Paul म्हणाले.