Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3,43,09; 24 तासांत वाढले 10,667 नवे रूग्ण तर रिकव्हरी रेट 52.46 %

यामध्ये 1,53,178 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून 1,80,013 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. दुर्देवाने या कोरोना व्हायरसविरूद्धची 9900 जणांची झुंज अपयशी ठरली आहे.

Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सध्या कोरोनाबाधितांचे सर्वाधिक रूग्ण असलेल्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या भारत देशामध्ये आज मागील 24 तासामध्ये सुमारे 10,667 नवे रूग्ण तर 380 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान आज (16 जून) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या ताज्या आकडेवाडीनुसार सध्याच्या घडीला देशात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 3,43,091 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये 1,53,178 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून 1,80,013 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. दुर्देवाने या कोरोना व्हायरसविरूद्धची 9900 जणांची झुंज अपयशी ठरली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा काल रात्री दिलेल्या माहितीपर्यंत 1 लाख 10 हजार 744 च्या पार गेला आहे. आज देशाच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ होऊन तो 52.46 % झाला आहे.

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोव्हिड 19 च्या प्रसाराचा वेग रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या 30 जून पर्यंत या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असेल. मात्र या काळात रूतलेली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी अनलॉक 1 देखील जाहीर केला आहे. देशात टप्प्याटप्प्याने व्यवहार, वर्दळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. Fact Check: कोव्हिड 19 चा भारतातील उच्चांक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल असा दावा करणारा अभ्यास ICMR ने केलेला नाही; PIB Fact Check ने केला खुलासा.

ANI Tweet

भारतासह जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत, लॉकडाऊन दरम्यान सरकारी नियामवलीचं पालन करत नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. देशात 30 जून नंतर काय? यावर निर्णय घेण्यासाठी तसेच देशभरातील विविध राज्यामधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांच्यसोबत प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा करतील.