India on 99-Year Lease: BJP प्रवक्त्या Ruchi Pathak यांना ट्रोल झाल्यावर उपरती, '99 वर्षांच्या करारावर भारताला स्वातंत्र्य' विधानाबाबत दिले स्पष्टीकरण
एका प्रसारमाध्यमाद्वारे आयोजित चर्चेदरम्यान या प्रवक्त्याने अशी मुक्ताफळे उधळली जी ऐकून हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे
भाजपच्या (BJP) एका महिला प्रवक्त्याने भारताच्या स्वातंत्र्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. एका प्रसारमाध्यमाद्वारे आयोजित चर्चेदरम्यान या प्रवक्त्याने अशी मुक्ताफळे उधळली जी ऐकून हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे. झाशीमध्ये आयोजित एका चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्या रुची पाठक (Ruchi Pathak) म्हणाल्या- 'भारताला अजून पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. देशाला 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अजून इंग्लंडद्वारे भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला आहे.’ या वक्तव्यानंतर रुची सोशल मिडियावर ट्रोल व्हायला लागल्या.
रविवारी झाशीमध्ये ललनटॉपचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पक्षांच्या युवा नेत्यांमध्ये चर्चा-वादविवाद सुरु होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी खासगीकरणाबाबत केंद्र सरकारला घेरले. एअर इंडिया विकायला काढली याबाबत त्यांनी भाष्य केले. याला उत्तर देताना भारतीय जनता पक्षाची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठक म्हणाल्या की, 'आझादी टू इंडिया कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. काँग्रेसने देशाचे स्वातंत्र्य 99 वर्षांच्या लीजवर घेतले आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि 1951 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली.’
रुची पाठक यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाठक यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे, काही लोकांनी तर त्यांना ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीची टॉपर’ असा टोमणा मारला आहे. चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर आता रुची पाठक यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (हेही वाचा: Agni-5 Missile: भारताला मोठे यश; अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पल्ला पाच हजार किमी)
पाठक म्हणाल्या की, ‘व्यासपीठावर मी जे काही बोलले ते ‘हीट ऑफ द मूव्हमेंट’ होते. याचा देशवासीयांच्या भावना दुखावण्याचा किंवा संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नव्हता. हे माझे वैयक्तिक विधान होते त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. मी ज्या आधारावर भारताला भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळाले आहे असे म्हटले, कदाचित तो स्त्रोत चुकीचा असू शकतो, परंतु मी काही ब्लॉग आणि राजीव दीक्षित यांच्या विधानाच्या आधारे हे वक्त्यव्य केले.’