INDIA Boycotts 14 TV Anchors: इंडिया आघाडीने देशातील 14 टीव्ही अँकरवर टाकला बहिष्कार; त्यांच्या शोमध्ये पाठवणार नाही प्रतिनिधी

युती पक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला. या प्रस्तावावर पुढे जात युतीने गुरुवारी 14 अँकरची यादी जाहीर केली.

India Alliance | Twitter

विरोधी पक्ष आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (INDIA) ने 10 वाहिन्यांच्या 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीच्या 'इंडिया’च्या मुंबई बैठकीत स्थापन झालेल्या समन्वय समितीच्या सदस्यांची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत झाली. या बैठकीत इंडिया आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत विरोधी आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे की, ते काही टीव्ही अँकरच्या शोमध्ये त्यांचे नेते आणि प्रवक्ते पाठवणे थांबवतील.

बैठकीत काही न्यूज अँकर विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी चर्चा झाली. युती पक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला. या प्रस्तावावर पुढे जात युतीने गुरुवारी 14 अँकरची यादी जाहीर केली. काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेडा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

या अँकर्समध्ये अदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव आरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा यांचा समावेश आहे. हे सर्व विविध टीव्ही चॅनेलमध्ये शो होस्ट करतात. (हेही वाचा: Congress कडून खासदारांना 18-22 सप्टेंबर दरम्यानच्या विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्याचे व्हिप जारी)

याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘दररोज संध्याकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनेल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. अशा स्थितीत, इंडिया आघाडीने ठरवले आहे की, 'आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही'. 'भारत द्वेषमुक्त भारत' हे आमचे उद्दिष्ट आहे, भारत एक होईल, इंडिया जिंकेल.’