Coronavirus: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर, पीएम नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
यापूर्वी 19 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते व त्यावेळी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती.
भारतातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटना पाहता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केले. यापूर्वी 19 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते व त्यावेळी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. आजच्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यापासून वाचण्यासाठी फक्त ‘Social Distancing’, म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय असल्याचे सांगितले. हे Social Distancing भारतातील सर्व नागरिकांसाठी लागू असल्याचेही ते म्हणाले.
आजच्या भाषणात पीएम मोदी यांनी मोठी घोषणा करत, आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन (Lockdown) केले जाणार असल्याचे सांगितले. हे लॉक डाऊन तब्बल 21 दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच आता आज रात्रीपासून पुढचे 21 दिवस कोणताही नागरिक आपल्या घरातून बाहेर पडू शकणार नाही. कोरोनाची वाढत असलेली साखळी तोडण्यासाठी सध्या लॉक डाऊन हा एकच पर्याय असल्याचे पीएम मोदी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण भारत पुढच्या 21 दिवसांसाठी बंद असणार आहे.
आपल्या भाषणात पीएम मोदी यांनी सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले एक पोस्टरही दाखवले. ज्यामध्ये नमूद केले होते, - कोरोना म्हणजे ‘कोई रोडपर ना निकले’. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संक्रमणाचे एक उदाहरण दिले. ते म्हणले, कोरोना संसर्ग 1 लाख लोकांना होण्यासाठी 67 दिवस लागले. त्यानंतर अवघ्या 11 दिवसांमध्ये पुढचे 1 लाख लोक संक्रमित झाले. त्यानंतर हीच संख्या 3 लाख होण्यासाठी अवघे 4 दिवस लागले. यावरूनच विचार करू शकता की हा विषाणू किती वेगाने पसरत आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी घरीच राहणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी पटवून सांगितले.
आरोग्यसेवा अतिशय उत्तम असणारे देश, जसे की चीन, अमेरिका, इटली हे सुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखू शकले नाही. आज त्यांच्याच अनुभवावरून शिकत भारतामध्ये अजून परिस्थिती बिघडण्याआधी 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहीर केले गेले. तसेच आज केंद्र सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. या पैशांतून कोरोनाशी लढण्याबाबतची उपकरणे आणि गोष्टी पुरवल्या जातील. यावेळी पंतप्रधानांनी सर्व राज्यांचे प्राधान्य हे त्यांच्या राज्याची आरोग्यसेवा असायला हवी असेही सांगितले.
तसेच त्यांनी या काळात खोट्या आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता फक्त सरकारने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. अशाप्रकारे आपल्या संपूर्ण भाषणात पीएम नरेंद्र मोदी यांनी जनतेने घरातच बसून राहणे किती व कसे महत्वाचे आहे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 5 रुग्णांची पुष्टी, तर 60 जणांना मिळाला डिस्चार्ज; BMC जारी केला आजचा अहवाल)
दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज भारतात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 519 पर्यंत वाढली आहे. यामध्ये डिस्चार्ज मिळालेले 39 व 9 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नविन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण रुग्ण संख्या 107 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली मधील इस्लामपूरचे 4, पुण्याचे 4, सातारा जिल्ह्यातील 4 तर, अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे.