जाणून घ्या भारतातील लॉक डाऊनचा प्रदूषणावर काय झाला परिणाम; दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच उद्भवली ‘ही’ परिस्थिती
अशावेळी जवळजवळ सर्व प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे थांबले आहेत. रस्त्यावर लोक नाहीत, वाहने नाहीत. या सर्वांचा परिणाम आता पर्यावरणावर दिसू लागला आहे
सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. अशावेळी जवळजवळ सर्व प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे थांबले आहेत. रस्त्यावर लोक नाहीत, वाहने नाहीत. या सर्वांचा परिणाम आता पर्यावरणावर दिसू लागला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत 103 शहरांपैकी 90 शहरांमध्ये कमीतकमी वायू प्रदूषण (Air Pollution) नोंदवले गेले आहे. तज्ञांनी ही गोष्ट ‘वेक अप कॉल’ म्हणून घेतली आहे व पुढे देखील प्रदूषणाची अशीच स्थिती राहावी यासाठी सध्याच्या परिस्थितीमधून धडा घ्यावा असे सांगितले आहे.
लॉक डाऊनमुळे पृथ्वीवरील गोंगाट आणि कंपने कमी झाले असून, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही 5 टक्क्यांनी कमी झाले आहे. दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच कार्बन उत्सर्जनाची पातळी इतकी खाली आली आहे. गेल्या आठवडाभरात देशातील 85 हून अधिक शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 100 च्या खाली आहे. याचा अर्थ या शहरांमधील हवा चांगली आहे. पीएम 2.5 आणि पीएम 10 मधील धूळ कणांच्या प्रमाणात 35 ते 40% पर्यंत घट झाली आहे. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन, सल्फर ऑक्साईड आणि ओझोनचे प्रमाणही कमी झाले. महत्त्वाची बाब म्हणजे प्रदूषणाची ही इतकी कमी पातळी पावसातही असत नाही. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बुलंदशहर आणि गुवाहाटी वगळता सर्व शहरांची हवा समाधानकारक श्रेणीत होती.
अहवालानुसार नायट्रोजन ऑक्साईड (NOX) प्रदूषण पातळी, ज्यामुळे श्वसनाचा धोका वाढू शकतो, त्यातही घट झाली आहे. प्रदूषण मुख्यतः अधिक वाहनांच्या हालचालीमुळे होते, मात्र आता NOX प्रदूषणात पुण्यात 43 टक्के, मुंबईत 38 टक्के आणि अहमदाबादमध्ये 50 टक्के घट झाली आहे. प्रदूषणाच्या कमी पातळीमुळे पंजाबच्या दोआबाच्या आजूबाजूच्या परिसरातून हिमाचल पर्वतरांगांचेही (धौलाधार 213 km व पीर पंजाल 474 km दूर आहे) दर्शन झाले. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संकटावेळी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी Uber कंपनीने NHA सोबत केली भागिरादी)
महत्वाचे म्हणजे लॉक डाऊनमुळे गंगा खूप स्वच्छ झाली आहे. गंगेत आता कोणत्याही प्रकारचा औद्योगिक कचरा टाकला जात नाही, त्यामुळे गंगेचे पाणी नितळ झाले आहे. रिअल टाइम वॉटर मॉनिटरिंगमध्ये गंगा नदीचे पाणी 36 देखरेखी केंद्रांपैकी 27 ठिकाणी आंघोळीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह विविध ठिकाणी गंगेच्या पाण्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.