Immunity Against COVID-19: कोरोना व्हायरसपासून बरे झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत अबाधित राहते रोगप्रतिकारशक्ती; रिसर्चमधून खुलासा

यामध्ये निष्पन्न झाले आहे की, SARS-CoV-2 विषाणूच्या संसर्गानंतर मानवी शरीरात प्रतिकारशक्ती सुमारे 5 महिने अबाधित राहते.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संबंधित रोग प्रतिकारशक्तीवर (Immunity) केलेल्या संशोधनात एक महत्वाची बाब समोर आली आहे. यामध्ये निष्पन्न झाले आहे की, SARS-CoV-2 विषाणूच्या संसर्गानंतर मानवी शरीरात प्रतिकारशक्ती सुमारे 5 महिने अबाधित राहते. भारतीय वंशाच्या संशोधकांनी अमेरिकेत हे संशोधन केले आहे. अ‍ॅरिझोना विद्यापीठातील (University of Arizona) संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या सुमारे 6000 लोकांच्या नमुन्यांचा अभ्यास केला आहे आणि अँटीबॉडीज तयार होण्याचा अभ्यास केला आहे. 'अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य म्हणाले, 'आम्हाला स्पष्टपणे दिसून आले आहे की, संसर्गानंतर पाच-सात महिने उच्च प्रतीच्या अँटीबॉडीज शरीरात राहिली आहेत.'

इम्यूनिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे म्हटले आहे की, कोविड-19 शी लढण्यासाठी विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीबद्दल बर्‍याच लोकांनी सांगितले आहे की, ती जास्त काळ टिकत नाही. आता आम्ही या अभ्यासाद्वारे या प्रश्नाची तपासणी केली आणि आढळून आले आहे की, रोग प्रतिकारशक्ती असते आणि ती कमीतकमी 5 महिने कायम राहते. अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जानको निकोलिच-झुगिच (Janko Nikolich-Zugich) यांनी सांगितले की, जेव्हा विषाणू पेशींना संसर्गित करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती अल्पायुषी प्लाझ्मा पेशी बनवते जे विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात. या अँटीबॉडीज संक्रमणाच्या 14 दिवसांच्या आत रक्ताच्या चाचणीत दिसून येतात. (हेही वाचा: जगभरात कोरोना रुग्ण बरे झालेल्या देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी, देशात 62 लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात)

भट्टाचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक महिन्यांपासून कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीच्या पातळीवर अभ्यास केला. पाच ते सात महिन्यांपर्यंत रक्त चाचण्यांमध्ये संशोधकांना मुबलक कोरोना व्हायरस अँटीबॉडी आढळले. त्यांचा विश्वास आहे की यापेक्षा अधिक काळ प्रतिकारशक्ती टिकू शकेल. पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाच्या अँटीबॉडी तीन महिन्यांत गायब झाल्या आहेत. यामुळे कोविड विरूद्धची प्रतिकारशक्ती ही काही महिन्यांपर्यंत टिकते अशी शक्यता वाढली होती. मात्र भट्टाचार्य मानतात की, हा अभ्यास अल्पकालीन प्लाझ्मा पेशींवर आधारित होता आणि यामध्ये दीर्घकालीन प्लाझ्मा पेशी आणि त्यातून तयार केलेल्या उच्च प्रतीच्या अँटीबॉडीजचा विचार केला नाही.