Hyderabad Shocker: कोल्डड्रिंक चोरल्याच्या रागात 10 वर्षांच्या मुलाला नग्न करून बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर, दुकानदाराला अटक
मुलाला पाईपने मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या काकांनी केला आहे. ते म्हणाले, ‘जर मुलाने चोरी केली असेल तर ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल, परंतु आरोपी दुकानदार आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाही.’
एक कोल्डड्रिंक (Cold Drink) चोरल्याच्या कारणावरून एका लहान मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हैदराबादमधून (Hyderabad) समोर आली आहे. ही अमानुष घटना नामपल्ली पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, एका दुकानदाराने एका लहान मुलाला विवस्त्र करून, हातपाय बांधून मारहाण केली. दुकानदाराची क्रूरता इथेच संपली नाही व बेदम मारहाण करूनही त्याचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने या मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली.
हे प्रकरण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलाचे वय अवघे 10 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा नावाचा व्यक्ती नामपल्ली पोलीस स्टेशन परिसरात एक किराणा दुकान चालवतो. त्याच्या लक्षात आले की, या दहा वर्षांच्या मुलाने दुकानातून कोल्डड्रिंक चोरले आहे. त्यानंतर त्याने मुलाचे सर्व कपडे काढले, त्याचे हात-पाय बांधले व त्याला बेदम मारहाण केली. शेवटी त्याने मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली.
हा मुलगा वेदनेने ओरडत होता, मात्र तरीही कृष्णाने त्याला त्रास देणे चालूच ठेवले. तो एवढ्यावरच थांबला नाही, ही संपूर्ण घटना घडल्यानंतर त्याने मुलाचा व्हिडिओही बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. (हेही वाचा: मुलीला आयटम, माल, झम्मक-छल्लो म्हण्टल्यास पुरुषास होणार तब्बल तीन वर्षांची जेल)
दरम्यान. पीडित मुलाच्या आईने चोरीचा आरोप खोटा असल्याचे सांगितले. मुलाला पाईपने मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या काकांनी केला आहे. ते म्हणाले, ‘जर मुलाने चोरी केली असेल तर ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल, परंतु आरोपी दुकानदार आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाही.’ या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगा पूर्णपणे विवस्त्र असून, त्याचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले दिसत आहेत.