Hindu Rashtra: '2 ऑक्टोबर पर्यंत भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करावे, अन्यथा मी जल समाधी घेईन'- Sagadguru Paramhans Acharya Maharaj यांची मागणी

ते म्हणाले आहेत की, 2 ऑक्टोबर पर्यंत भारताला 'हिंदु राष्ट्र' (Hindu Rashtra) घोषित करावे, अन्यथा मी सरयू नदीत जल समाधी घेईन

Sagadguru Paramhans Acharya Maharaj (Photo Credit: ANI)

जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज (Jagadguru Paramhans Acharya Maharaj) यांनी अयोध्येत एक वादग्रस्त मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, 2 ऑक्टोबर पर्यंत भारताला 'हिंदु राष्ट्र' (Hindu Rashtra) घोषित करावे, अन्यथा मी सरयू नदीत जल समाधी घेईन. एवढेच नव्हे, तर केंद्र सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व रद्द करावे, असेही ते म्हणाले आहेत. अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उभारणीची तयारी जोरात सुरू आहे, अशात भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे अशी संत समाजाच्या एका वर्गाची इच्छा आहे. परमहंस यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा उत्तर प्रदेशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व पक्षांचे नेते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत.

परमहंस महाराज सातत्याने ख्रिस्ती आणि मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करत आहेत. ते इतर प्रदेशांतील संतांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. 1 ऑक्टोबर रोजी अनेक हिंदू संघटना परमहंसांच्या समर्थनार्थ हिंदू सनातन धर्म संसदेचे आयोजन करतील. याआधी आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीने अयोध्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवर प्रश्न उपस्थित केले होते. परमहंस महाराजांनी ट्रस्टवर लावलेले अनेक आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते आणि बदनामीसाठी एसपी आणि आप यांच्यावर 1 हजार कोटी रुपयांचा खटला दाखल करण्याबाबत भाष्य केले होते.

परमहंस महाराजांनी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी आपल्या मागणीसाठी 15 दिवसांचे उपोषण केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आश्वासन मिळाल्यावर त्यांनी उपोषण सोडले. यापूर्वी, त्यांनी द्वारका शारदा पीठाचे प्रमुख शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजेच्या 'मुहूर्ता'वरून आव्हान दिले होते. (हेही वाचा: हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलेल्या त्रिपुरा मधील मुस्लिम मुलीची 66 दिवसानंतर सुटका)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत कारण इथलेच आहेत, आणि त्यांचे पूर्वज बाहेरून आलेले नाहीत.