Hindu Faith: आंध्र प्रदेश सरकार राज्यभरात बांधणार 3000 मंदिरे; हिंदू श्रद्धा वाचवण्यासाठी घेतला निर्णय, तिरुपती देवस्थानमकडून प्रत्येक मंदिराला मिळणार 10 लाख रुपये

सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक गावात मंदिर बांधण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांपैकी 8 लाख रुपये मंदिराच्या बांधकामासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

हिंदूंच्या श्रद्धेचे (Hindu Faith) रक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने राज्यात 3000 हून अधिक मंदिरे (Temples) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक गावात मंदिर असावे, या ध्येयाने आपण काम करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, राज्यात यापूर्वी 1330 मंदिरे बांधली जाणार होती. आता त्यात आणखी 1465 मंदिरांची भर पडणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी (28 फेब्रुवारी 2023) प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले की, सरकारने मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने गरीब वर्गातील लोकांच्या भागात मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, राज्यात यापूर्वी 1330 मंदिरे बांधली जाणार होती, त्यात आता 1465 मंदिरांची भर पडली आहे. एवढेच नाही तर आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरेही यामध्ये जोडली जाणार आहेत.

या हिंदू मंदिरांच्या बांधकामासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमचा श्री वाणी ट्रस्ट प्रत्येक मंदिराला 10 लाख रुपये देईल, असेही सत्यनारायण यांनी म्हटले आहे. बंदोबस्त विभागाकडून उभारण्यात येत असलेल्या 978 मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर 25 मंदिरांच्या बांधकामाचे काम सहाय्यक अभियंत्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय अन्य काही सहाय्यक अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर इतर काही मंदिरे स्वयंसेवी संस्थांद्वारे बांधली जात आहेत.

त्यांनी असेही म्हटले आहे की, काही मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि मंदिरांमधील धार्मिक विधींसाठी तरतूद केलेल्या 270 कोटींपैकी 238 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात 5000 रुपये प्रति मंदिर दराने धार्मिक विधींसाठी (धूप दीप नैवेद्यम) राखून ठेवलेल्या 28 कोटींपैकी 15 कोटी रुपये मंदिरांना देण्यात आले आहेत. सन 2019 पर्यंत धूप दीप नैवेद्यम योजनेअंतर्गत केवळ 1561 मंदिरांची नोंदणी झाली होती, तर आता ही संख्या 5000 वर पोहोचली आहे. (हेही वाचा: Robotic Elephant In Kerala Temple: केरळात आता रोबोटिक हत्ती करणार धार्मिक विधी)

दरम्यान, आंध्र प्रदेशात एकूण 26 जिल्हे आहेत. सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक गावात मंदिर बांधण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांपैकी 8 लाख रुपये मंदिराच्या बांधकामासाठी खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित 2 लाखांची रक्कम मूर्ती तयार करण्यासाठी किंवा खरेदीसाठी वापरली जाणार आहे.