Himachal Rain Disaster: हिमाचल प्रदेशात पावसामुळे 2 हजारांहून अधिक घरांची पडझड, 344 रस्ते अजूनही बंद; राज्याचे तब्बल 8099.56 कोटींचे नुकसान

यामुळे राज्यभरात खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

Himachal Rain Disaster (संग्रहित संपादित प्रतिमा)

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मागील काही दिवसात पावसाने कहर केला आहे. पावसामुळे रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात पावसामुळे 24 जूनपासून आतापर्यंत राज्य सरकारचे तब्बल 8099.56 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत राज्यभरात 2 हजार 216 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, याशिवाय 9 हजार 819 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार 300 दुकाने आणि 4 हजार 702 प्राण्यांच्या घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन महिन्यांत राज्यभरात 130 भूस्खलन आणि सात भीषण पुराच्या घटनांची नोंद झाली आहे.

महत्वाचे म्हणजे 24 जूनपासून हिमाचल प्रदेशात 346 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय विविध अपघातांमध्ये अद्याप 38 जण बेपत्ता आहेत. तसेच राज्यभरात 331 जण जखमी झाल्याची माहिती आहे. राज्यात सर्वाधिक जीवितहानी शिमल्यात झाली आहे. येथे पावसामुळे झालेल्या अपघातात 62 तर, रस्ते अपघातात 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. 24 जूनपासून राज्यभरात रस्ते अपघातात 119 जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर सात जण बेपत्ता आहेत. (हेही वाचा: Mandsaur Bus Accident: भोपाळहून भिलवाडा येथे जाणारी बस रस्त्याच्या मधोमध उलटली; 21 जण जखमी)

हिमाचल प्रदेशमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. या विभागाचे आतापर्यंत 2712.19 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे शेकडो रस्ते खराब झाले आहेत, याशिवाय 97 पुलांचे नुकसान झाले असून 19 पूल पुरात वाहून गेले आहेत. राज्यात पावसानंतर दरड कोसळल्याने रस्ते बंद करण्यात येत असून 344 रस्ते अजूनही बंद आहेत.

पहिल्या टप्प्यात 7 जुलै ते 12 जुलै या कालावधीत झालेल्या पावसाने कहर केला आणि त्यानंतर 13-14 ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. यामुळे राज्यभरात खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने हा विध्वंस राज्य आपत्ती म्हणून घोषित केला आहे आणि आता सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारकडे या विनाशाला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.