Hello Taxi: दुप्पट रिटर्नचे आश्वासन देऊन तब्बल 900 लोकांना 250 कोटींना घातला गंडा; गुंतवणूकदारांची फसवणूक, महिला संचालकाला गोव्यातून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लोकांना आपल्या अॅप बेस्ड टॅक्सी अॅग्रीगेटर कंपनीत (Taxi Aggregator Company) गुंतवणूक करण्यास उद्युक्त करत असे
फसवणूकीच्या (Fraud) आरोपाखाली पोलिसांनी एका 47 वर्षीय महिलेला दक्षिण गोव्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लोकांना आपल्या अॅप बेस्ड टॅक्सी अॅग्रीगेटर कंपनीत (Taxi Aggregator Company) गुंतवणूक करण्यास उद्युक्त करत असे. लोकांना ती भरपूर रिटर्नचे गाजर दाखवून त्यांच्याकडून पैसा उकळत असे. नोएडा येथील अॅप आधारित टॅक्सी कंपनी, ‘हॅलो टॅक्सी’ (Hello Taxi) मध्ये गुंतवणूकीवर दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देऊन या महिलेने 900 लोकांची 250 रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीत एका महिलेसह चार संचालक होते, ज्या सर्वांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, धर्मेंद्र व इतर पीडित व्यक्तींनी एसएमपी इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Hello Taxi) वर फसवणुकीचे आरोप केले आहे. हॅलो टॅक्सीचे पदाधिकारी सरोज महापात्रा, राजेश महंतो, सुंदर भाटी, हरीश भाटी आणि महिला संचालक यांनी लोकांनी हॅलो टॅक्सीमध्ये गुंतवणूकीसाठी मासिक आधारावर 200 टक्के व्याज देतो असे सांगून त्यांची फसवणूक केली. त्यांनी ना व्याज दिले, ना पैसे परत केले. आतापर्यंत यामध्ये 900 हून अधिक गुंतवणूकदार होते आणि त्यात गुंतलेली रक्कम सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: ठाणे: नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक)
याबाबत 2019 मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आरबीआय किंवा सेबीसारख्या संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता न घेता कंपनीने गुंतवणूकदारांकडून बुकिंग स्वीकारले. सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला गेला परंतु गुंतवणूकदारांकडून बडी रक्कम वसूल केल्यानंतर पैसे देणे बंद केले. संशय येऊ नये म्हणून आरोपी सतत कार्यालये बदलत होते. सुरुवातीला, कंपनीचे कार्यालय गाझियाबाद येथे होते, जे काही महिन्यांनंतर पाटपरगंज औद्योगिक क्षेत्रात हलविले गेले. त्यानंतर ते रोहिणी सेक्टर-16 मध्ये आणले गेले.
कंपनीचे बँक खाते तपासून पाहिले असता त्यामध्ये ३.27 कोटी आढळले व त्यानंतर हे खाते फ्रीझ केले गेले. जमा केलेल्या निधीतून घेतलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या 60 नवीन मोटारी नोएडा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी अद्याप अटक केलेल्या महिलेची ओळख जाहीर केलेली नाही. चार संचालकांपैकी महतोला 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.