Anil Deshmukh on Hathras Gangrape: इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या राज्यातील 'जंगल राज' विरुद्ध कारवाई करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची UP CM योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या घटनेचा निषेध करत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) येथील सामुहिक बालात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या घटनेचा निषेध करत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी देखील आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CMYogi Adityanath) यांच्यावरही टीका केली आहे. इतरांना उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या राज्याची काळजी घ्या, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
"आम्ही पाहतोय, गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतरांना सल्ले देत आहेत. मी त्यांना सल्ला देतो की, तुम्ही तुमच्या राज्याची काळजी घ्या आणि तिकडे माजलेला जंगल राज याविरुद्ध कठोर कारवाई करा," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ANI Tweet:
दरम्यान, हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पीडित मुलगी जबर जखमी झाली. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 29 सप्टेंबर रोजी तिची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. तिच्यावर युपी पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेस पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असून दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणही होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस गॅंगरेप प्रकरणी चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय स्पेशल इंवेस्टीगेशन टीमची नेमणूक केली असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची दखल घेत दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांना दिले आहेत.