Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून अंत्यसंस्कार; कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवल्याचा आरोप

तिथे जाऊन त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले. पीडितेचा भाऊ आणि वडील पोलिसांच्या कृतीविरोधात धरणे धरुन बसले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा भाऊ आणि वडिलांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत बसवले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले.

Molestation| File Photo

हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape) प्रकरणातील पीडितेचा उपचार सुरु असताना रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) या पीडितेवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मध्यरात्री 2.30 वाजता या पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोप करण्यात येत आहे की, पीडितेवर अंत्यसंस्कार होत असताना पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना घरामध्ये बंद करुन ठेवले होते. दावा करणयात येत आहे की, पीडितेवर अंत्यसंस्कार करतानाचा एक व्हिडिओही बनविण्यात आला आहे. यात पोलिस पीडितेच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर पीडेतेचे कुटुंबीय उभे होते. अंत्यसंस्कार करण्यास विरोध करत होते. परंतू, पोलिसंनी कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता पीडितेवर अंत्यसंस्कार केले. पीडितेची आई रुग्णवाहिकेसमोर रस्त्यावर आडवी झोपली तरीही पोलिस थांबले नाहीत. पोलिसांनी अंत्यसंस्कार केलेच

पीडितेच्या भावाने आरोप केला आहे की, कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता पोलिस पीडेतेचे शव घेऊन घरापासून दूर गेले. तिथे जाऊन त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले. पीडितेचा भाऊ आणि वडील पोलिसांच्या कृतीविरोधात धरणे धरुन बसले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा भाऊ आणि वडिलांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत बसवले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. स्थानिकांनीही पोलिसांच्या या कृतीला विरोध केला. या घटनेनंतर परिसरात पोलिसांविरोधात संतप्त वातावरण आहे. तसेच, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (हेही वाचा, Hathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू)

दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाबाहेर जमलेल्या जमावाने आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींना फाशी मिळावी अशी मागणी ते करत होते. दरम्यान, पोलीस दिल्लीपासून सुमारे 200 किलोमीटर दूर असलेल्या हाथरस या गावी पीडितेचे पार्थीव घेऊन पोहोचले. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे पार्थिव देण्याची मागणी केली. जेणेकरुन पीडितेच्या पार्थिवावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. परंतू, पोलिसांनी कुटुंबीयांचे ऐकण्यास नकार दिला. त्यांनी कुटुंबीयांना एका बाजूला ठेऊन पीडितेवर गुपचूप पणे अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप करण्या आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे. या आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. याचही आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच त्यांची मदत केली नाही. त्यानंतर लोकभावना आणि आमच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना 14 सप्टेंबरला एका गावात घडली. हे गाव दिल्लीपासून 200 किलोमीटर दूर आहे.