Haryana: 'Sorry मला माहित नव्हते हे कोरोनाचे औषध आहे'; चोरीला गेलेले Coronavirus लसीचे हजारो डोस चोराने केले परत
चोरट्याने बॅगेत एक चिठ्ठीही ठेवली होती, ज्यामध्ये म्हटले होते- ‘मला माफ करा, मला माहित नव्हते की त्यामध्ये कोरोना लस आहे.’
देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औषधे, बेड्स, लस यांची कमतरता भासत आहे. अशात हरियाणाच्या (Haryana) जींदमधून (Jind) मोठ्या प्रमाणावर कोरोना लस (Covid-19 Vaccines) चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने लसीचे एकूण 1710 डोस चोरले होते. यामध्ये 1270 कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या 440 डोसचा समावेश होता. मात्र, महत्वाचे म्हणजे चोराने या सर्व लसी परत केल्या आहेत. जींद सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याबाहेर एका चहाच्या टपरीवर चोराने या लसी सोडल्या होत्या. त्याने याबाबत एका चिठ्ठीमध्ये माफीही मागितली आहे.
हा चोर नक्की कोण आहे याबाबत काही संकेत सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जींदच्या शासकीय रुग्णालयात कोरोना लस ठेवण्याचे मुख्य केंद्र आहे. त्याचबरोबर, कॅम्पसमध्ये पीपी सेंटर देखील आहे. त्याठिकाणीही कोरोना लस ठेवल्या जातात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस ठेवले होते.
जींदचे आरोग्य निरीक्षक राममेहर वर्मा यांनी सांगितले की, बुधवारी रात्री कोणीतरी पीपी सेंटरचे कुलूप तोडून लस चोरी केली. सकाळी जेव्हा केंद्रावर पोहोचलो तेव्हा कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. आतमध्ये लस नव्हती. चोरट्याने 1710 लसीचे डोस चोरले होते. याशिवाय तिथे ठेवलेल्या काही फाईल्सही चोरीला गेल्या होत्या. मात्र, त्याच फाईल्ससह ठेवलेले 50 हजार रुपये चोरी झाले नव्हते. लस चोरीचे प्रकरण उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे ही लस काळ्या बाजारात विकण्यासाठी चोरी झाली असावी असा समाज झाला.
मात्र, संध्याकाळी चोराने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर एक प्लास्टिकची पिशवी ठेवली, ज्यामध्ये चोरलेल्या लसीचे डोस होते. चोरट्याने बॅगेत एक चिठ्ठीही ठेवली होती, ज्यामध्ये म्हटले होते- ‘मला माफ करा, मला माहित नव्हते की त्यामध्ये कोरोना लस आहे.’ दरम्यान, रुग्णालय व्यवस्थापनाकडून तक्रार आल्यानंतर पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्यात दोन लोक चोरी करताना दिसत आहेत. त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला जात आहे.