नववधू पळाली अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन, सॉफ्टवेयर इंजीनियर पती म्हणाला 'बायकोचे लग्नाआधीच होते अफेअर'

एचएएल पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत राहुल याने विश्वासघात आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सासरी आलेल्या नववधूने चक्क घरातील दागिणे (Jewelry) आणि 2.5 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. हा प्रकार कर्नाटक राज्यातील चिनप्पनहल्ली येथे घडला आहे. नववधुसोबत तिचे आई-वडीलही असल्याचा आरोप सॉफ्टवेयर इंजीनियर असलेल्या पतीने केला आहे. पतीचे नाव राहुल चोपडा (वय 29 वर्षे) तर पत्नीचे नाव कशिश दुसेजा (वय-27 वर्षे) असल्याचे समजते. दोघांनीही अरेंज मॅरेज केले होते. पतीने आरोप केला आहे की, विवाह ठरत असताना पत्नी कशिश हिने आपले दुसऱ्या कुणावर प्रेम असल्याचे सांगितले नव्हते.

चिनप्पनहल्ली येथे राहणारे आणि हरियाणा येथील मूळ रहिवासी असलेले राहुल यांने पत्नी कशिश दुसेजा आणि तिच्या आई-वडीलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एचएएल पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत राहुल याने विश्वासघात आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

राहुल याने पोलिसांना सांगितले की, आम्ही अॅरेंज मॅरेज केले होते. हरियाणा येथे विवाहबद्ध झाल्यानंतर आम्ही चिनप्पनहल्ली येथील एचएएल येथील एका फ्लॅटमध्ये राहायला आलो. मात्र, पत्नीचे एका व्यक्तीसोबत अफेअर सुरु होते. तिने लग्नापूर्वी किंवा लग्न होत असताना या अफेअरची मला कल्पना दिली नव्हती. विवाहनंतर आम्ही फ्लॅटमध्ये राहायला आलो असता अवघ्या एक महिन्यातच पत्नीने आपले दागीणे आणि 2.5 लाख रुपये रोख असा ऐवज घेऊन पोबारा केला. तिच्या या कृत्यात तिचे आईवडीलही सहभागी आहेत.

पती राहुल याने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, '21 फेब्रुवारी 2020 या दिवशी पत्नीचे आई-वडील आपल्या घरी आले आणि रोख रक्कम आणि दागीने बांधू लागले. पत्नीला सोबत घेऊन जाऊ लागले. मी त्यांना विचारले असता आपण तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालो असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ सुरु केली. मी पोलिसांना फोन करुन मदत मागितली. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. मात्र, पत्नी आणि तिच्या आईने पोलिसांत न येता हरीयाणाला निघून गेले. या प्रकारानंतर मी पत्नीचा लॅपटॉप तपासला असता त्यात तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो सापडले. ' (हेही वाचा, गोदिंया: चारित्र्यावर संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या)

दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी संबंधीत महिलेला आम्ही पोलिस स्टेशनवर येण्सा सांगितले होते. परंतू, संबंधीत महिला पोलिस स्टेशनला न येता थेट विमानतळावर गेली आणि तिथून ती शहराबाहेर निघून गेली. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.