Haryana Shocker: हरियाणामध्ये 500 मुलींचा प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; मुख्यमंत्री Manohar Lal Khattar यांना लिहिले पत्र
याआधीही विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने आरोपीला दोनदा क्लीन चिट दिली आहे.
हरियाणातील (Haryana) सिरसा (Sirsa) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध चौधरी देवीलाल विद्यापीठातील सुमारे 500 विद्यार्थिनींनी विद्यापीठातील प्राध्यापकावर आपल्या चेंबरमध्ये बोलावून लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत कुलगुरूंकडे वारंवार तक्रार करूनही प्राध्यापकावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आणि महिला आयोग यांना पत्रे लिहून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी विशेष तपास पथक (SIT) तयार करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री, राज्यपाल आणि महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या कृत्याबद्दल लिहिले आहे. आपली व्यथा मांडताना त्यांनी सांगितले की, प्राध्यापक आपल्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावून आपला लैंगिक छळ करत असे. हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. पीडित मुलींनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचून नागरिकांतून संताप व्यक्त होत असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरोपी प्राध्यापकाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा दावा त्याने केला आहे. तो म्हणाला की, मी विद्यापीठाशी संबंधित काही कामात सक्रिय होतो, त्यामुळेच मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधातील प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आरोप आहे. (हेही वाचा: Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करून बलात्कार, गरोदरपणामुळे बिंग फुटलं, गुन्हा दाखल)
माहितीनुसार, प्राध्यापकाविरोधात मुलींनी पत्र लिहिण्याची ही चौथी वेळ आहे. याआधीही विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने आरोपीला दोनदा क्लीन चिट दिली आहे. एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर त्या याप्रकरणी एफआयआर दाखल करणार आहेत. त्या पुढे म्हणाल्या, त्या प्रथम पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी करू. या कालावधीत जे काही समोर येईल, त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.