Harsh Vardhan Quits Politics: माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणालाच राम-राम, तिकीट कापल्यानंतर निर्णय केला जाहीर

भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. डॉ. हर्षवर्धन हे दिल्लीमधील चांदणी चौकचे विद्यमान खासदार आहेत. शनिवारी भाजपाने दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.  आपल्या एक्स अकाऊंवरुन त्यांनी पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. (हेही वाचा - BJP First candidate withdraws: अर्रर्र! भाजपचे तिकीट मिळूनही उमेदवार पवन सिंह यांची सपशेल माघार)

राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष देणार असून कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार असल्याचे हर्षवर्धन यांनी जाहीर केले आहे. डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते.