IPL Auction 2025 Live

Gujarat Hooch Tragedy: गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने मृत्यूंचा आकडा 32 वर; मुख्य आरोपीसह 14 जणांना अटक

या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद आणि बोटाड जिल्ह्यात बनावट दारूच्या (Hooch) सेवनामुळे आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आढळून आले आहे की, सोमवारी बरवाला येथील रोजीड गावात एका दारू भट्टीवर 8 गावातील लोक दारू पिण्यासाठी आले होते. तेथे लोकांना दारूऐवजी मिथेनॉल रसायन दिले गेले. हे मिथेनॉल अहमदाबाद येथून आणले होते. याच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, दारूच्या कारखान्यात मिथेनॉलचा पुरवठा केला जात होता. या रसायनाचा पुरवठा थेट अहमदाबादहून करण्यात आला. या मिथेनॉलमध्ये पाणी मिसळून ते दारू म्हणून विकले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सांगितले जात आहे की विषारी केमिकल मिसळल्यानंतर सुमारे 600 लिटर पाण्याला दारू म्हणून 40 हजार रुपयांना विकले गेले.

ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली जेव्हा बोटाडच्या रोझीद गावात आणि आसपासच्या इतर गावात राहणाऱ्या काही लोकांची प्रकृती खालावल्याने त्यांना बरवाला परिसर आणि बोटाड शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फॉरेन्सिक विश्लेषणात पीडितांनी मिथाइल अल्कोहोल प्राशन केल्याचे समोर आले आहे. याबाबत 14 जणांविरुद्ध खून आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे आणि बहुतेक आरोपींना आधीच ताब्यात घेतले आहे.

गुजरातच्या दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी राज्यात दारूबंदी लागू असूनही अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप केला. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप करत दारूविक्रीतून कमावलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. (हेही वाचा: लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आशिष मिश्राचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला)

दरम्यान, मंत्री वेणू मारोडिया म्हणाले की, ही घटना दुःखद आणि लज्जास्पद आहे. दारूबंदी असतानाही राज्यात दारूची विक्री कशी आणि कोणाकडून होत आहे, याची चौकशी केली जाईल. गुजरातमध्ये 1960 पासून दारूबंदी लागू करण्यात आली होती. 2017 मध्ये गुजरात सरकारने दारूबंदीशी संबंधित कायदा अधिक कडक केला होता. या अंतर्गत जर कोणी अवैधरित्या दारू विकत असेल तर त्याला 10 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.