GST Collections: ऑक्टोबरमध्ये 8 महिन्यानंतर प्रथमच जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे

ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 1,05,155 कोटींच्या पातळीवर पोहोचले आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

यावर्षी फेब्रुवारीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात एकूण जीएसटी कलेक्शन (GST Collections) 1 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 1,05,155 कोटींच्या पातळीवर पोहोचले आहे. त्यापैकी 19,193 कोटी रुपये सीजीएसटी, 25,411 कोटी रुपये एसजीएसटी आणि 52,540 कोटी रुपये आयजीएसटी आहेत. आयजीएसटीमधील वस्तूंच्या आयातीमधून 23,375 कोटी वसूल केले आहेत. सेस म्हणून 8,011 कोटी रुपये जमा झाले असून, त्यापैकी 932 कोटी रुपये आयात मालावर लावलेल्या सेसमधून वसूल करण्यात आले आहेत. वित्त मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. अर्थ मंत्रालयाने सांगितले की 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर-3 बी रिटर्न्सची एकूण संख्या 80 लाखांवर पोहचली आहे.

आयजीएसटी पैकी सरकारने 25,091 कोटी रुपयांचे सीजीएसटी आणि 19,427 कोटी रुपयांचे एसजीएसटी रॅग्युलर सेटलमेंट म्हणून दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पैसे भरल्यानंतर केंद्र सरकारच्या समभागातील सेटलमेंटची एकूण रक्कम 44,285 कोटी रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर राज्य हिस्सा म्हणून म्हणजे एसजीएसटी म्हणून 44,839 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

ऑक्टोबर 2020 मधील जीएसटी कलेक्शन मागील वर्षाच्या त्याच महिन्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये जीएसटी कलेक्शन 95,379 कोटी रुपये होते. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीएसटी कलेक्शन डेटा सलग अनेक महिने 1 लाख कोटींच्या आत राहिला आहे. (हेही वाचा: जनतेला महागाईचा फटका; मागील वर्षभरात कांद्याच्या किंमतींमध्ये 44 टक्के आणि बटाट्याच्या किंमतीमध्ये 108 टक्के वाढ)

महिन्याभरात आयातीद्वारे मिळालेला रेव्हेन्यू 9% जास्त आहे. देशांतर्गत स्तरावरील व्यवहारांच्या आधारे जीएसटीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत जीएसटी महसूलची वाढ अनुक्रमे- 14 टक्के, -8% टक्के आणि 5% झाली आहे. या आकड्यांवरून असे गृहीत धरले जाऊ शकते की अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी कलेक्शन, 15,799 कोटी रुपये होते. यानंतर कर्नाटकमध्ये 6,998 कोटी, तामिळनाडूमध्ये 6,901 कोटी आणि यूपीमध्ये 5,471 कोटी रुपयांचे जीएसटी कलेक्शन आहे.