Govind Dev Giri Maharaj यांचं मोठं विधान; 'ज्ञानव्यापी, कृष्णजन्मभूमी मुक्त करा आम्ही सारं विसरून जायला तयार!'
आता आपल्याला भविष्यात जगायचं आहे, भूतकाळात नाही. असं ते म्हणाले आहेत.
अयोद्धा राम मंदिर उद्घाटनाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केल्याने चर्चेत आलेल्या गोविंदगिरी महाराज (Govind Dev Giri Maharaj) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना 'आम्हांला केवळ 3 मंदिरं मुक्त करायची आहेत तेवढी समजुतदारीने द्या' असं म्हटलं आहे. अयोद्धेमधील राम मंदिरानंतर आता वाराणसी मध्ये ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदूंसाठी पूजेचा मार्ग खुला झाला आहे. हिंदू पक्षाकडून एक-एक मंदिर मुक्त करण्याची मोहीम सुरु झालीय का? या प्रश्नावर उत्तर देताना गोविंददेव गिरी महाराजांनी उत्तर दिलं आहे.
गोविंददेव गिरी महाराजांनी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या, ज्ञानवापी, कृष्णजन्मभूमी ही मंदिरं आम्हांला मुक्त करायची आहे. आता आपल्याला भविष्यात जगायचं आहे, भूतकाळात नाही. देशाचं भविष्य चांगलं पाहिजे. त्यामुळे समजदारीने हे तीन मंदिरं दिली तर आम्ही बाकीचं सगळं विसरुन जाऊ असं ते म्हणाले आहेत.
पहा गोविंददेव गिरी महाराजांची प्रतिक्रिया
भारतामध्ये इतर ठिकाणी देखील मंदिरं पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत त्याचं काय होणार? यावर बोलताना त्यांनी ,'आम्ही त्यांनाही समजावून सांगू. सगळ्या ठिकाणांसाठी एकच गोष्ट बोलता येणार नाही. कुठे समजदार लोक असतात तर कुठे नसतात. जिथे जशी परिस्थिती असेल तिथे तशी भूमिका घेऊ पण आम्हाला अशांतता निर्माण करायची नाही.' असं मत त्यांनी मांडलं आहे.