COVID-19 विरुद्धच्या लढ्यासाठी Google CEO सुंदर पिच्चाई यांची भारताला मदत; 'Give India' मध्ये 5 कोटींचे दान

आता गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिच्चाई हे देखील भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गीव्ह इंडिया ला त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची मदत केली आहे.

CEO of Google Sundar Pichai (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगाला जेरीस आणले असून भारत देशातही कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढताना दिसत आहे. देशावर ओढावलेल्या या महाभयंकर संकटात अनेक दिग्गज, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर आता गुगल (Google)आणि अल्फाबेट (Alphabet) कंपनीचे सीईओ (CEO) सुंदर पिच्चाई (Sundar Pichai) हे देखील भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गीव्ह इंडिया (Give India) ला त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची मदत केली आहे. या मदतीसाठी गीव्ह इंडियाने सुंदर पिच्चाई यांचे आभार मानले आहेत.

"रोजंदारी कामगारांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आर्थिक निधीची गरज होती. ती तुम्ही केलीत त्याबद्दल तुमचे आभार," अशा आशयाचे ट्विट गीव्ह इंडियाने केले आहे. देशभरातील असुरक्षित, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी गीव्ह इंडियाने आतापर्यंत तब्बल 12 कोटी रुपयांची रक्कम उभी केली आहे.

Give India Tweet:

कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटात गुगल तब्बल 800 मिलियन डॉलरची मदत लहान-मोठे उद्योग, आरोग्य संस्था, सरकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात सुंदर पिच्चाई यांनी केली होती. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करणाऱ्या संस्थांना तब्बल 250 मिलियन डॉलरची मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर लहान उद्योगांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी एनजीओ आणि जगभरातील वित्तसंस्थांमध्ये तब्बल 200 मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.