Gold Rate Today: सोन्याचे भाव दहा दिवसात 5000 रुपयांनी उतरले; जाणून घ्या आजचे दर
आजचा सोन्याचा दर हा 39 हजार 661 रुपये झाला आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि जगभरात आलेली मंदीची परिस्थिती पाहता काही दिवसांपूर्वी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात होते, ज्यामुळे सोन्याच्या भावात जबरदस्त उसळी आली होती, सोने 46 हजार रुपये प्रतितोळा मध्ये विकले जाण्याकडे या दरांची वाटचाल होती, मात्र आता मागील काही दिवसांपासुन सोन्याचे दर सलग घसरताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मागील केवळ दहा दिवसातच सोन्याचे भाव तब्बल 5000 रुपयांनी उतरले असून आज सोन्याने 40 हजारहून कमी दर गाठला आहे. आजचा सोन्याचा दर हा 39 हजार 661 रुपये झाला आहे. तर तुलनेने चांदीच्या भावात मात्र वाढ झालेली दिसून येतेय, प्रति किलो चांदीसाठी 48 हजार रुपये इतका दर आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील काही काळात जगभरावर मंदीचे सावट पसरले आहे, कोरोनामुळे जिथे लोकांना घरातून बाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे, तिथे गुंतवणुकीत सुद्धा पीछेहाट झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे, पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे, परदेशातील विमान फेऱ्या रद्द केल्याने विमान कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, चिकन मधून कोरोना पसरत असल्याच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायाला सुद्धा फटका बसला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया 23 पैशांनी वधारला आहे. तो सध्या 74.02 रूपये इतका आहे.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारावर सुद्धा कोरोना व्हायरसचं संकट कायम आहे. आज मंगळवार (17 मार्च) दिवशी सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या घसरणी सह 31,611.57 अंकांवर उघडला आहे. तर निफ्टी देखील 9018.10 वर उघडली आहे.