Gajanan Maharaj Prakat Din Images and Wishes: 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात शेअर करा शुभेच्छा संदेश, Wallpapers, आणि Greetings
महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन रविवार, 8फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने शेगावसह राज्यभरातील मठांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भक्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
मुंबई: "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने आज अवघी शेगावनगरी दुमदुमून गेली आहे. विदर्भाचे पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत श्री यांचा १४८ वा प्रकट दिन आज, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. माघ वद्य सप्तमी या तिथीचे औचित्य साधून देश-विदेशातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी शेगावमध्ये गर्दी केली आहे. प्रकट दिनानिमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. पहाटे काकड आरती, त्यानंतर श्रींची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. सकाळी १० ते १२ या वेळेत विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १२ वाजता मुख्य प्रकट दिन सोहळा पार पडणार आहे.
सायंकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा निघणार असून यामध्ये शेकडो दिंड्या आणि वारकरी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थानने चोख व्यवस्था केली असून दर्शन रांगांचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
भक्तांसाठी खास शुभेच्छा संदेश
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 'फेसबुक' आणि 'व्हॉट्सॲप'वर भाविक खालीलप्रमाणे संदेश आणि प्रतिमा शेअर करून शुभेच्छा देत आहेत:
"अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
"जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योगविद्येस सामर्थ्य येते, त्या माऊलीच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. गण गण गणात बोते!"
ऐतिहासिक पार्श्वभूमी
23 फेब्रुवारी 1878 (माघ वद्य सप्तमी) रोजी गजानन महाराज सर्वप्रथम शेगावात बंकटलाल अग्रवाल यांना दिगंबर अवस्थेत दिसले होते. तेव्हापासून हा दिवस 'प्रकट दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराजांनी आपल्या 32 वर्षांच्या वास्तव्यात अनेक लीला दाखवून जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली.
'श्री गजानन विजय' ग्रंथाचे पारायण
प्रकट दिनानिमित्त अनेक भाविक आपल्या घरी 'श्री गजानन विजय' या ग्रंथाचे पारायण करतात. या ग्रंथ वाचनाने मानसिक शांती आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. शेगावला जाऊ न शकणारे भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन श्रींचे दर्शन घेत आहेत.