दिल्ली येथील महिलांना केंद्राच्या मदतीशिवाय मेट्रो, बस सेवा लवकरच मोफत- अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज महिलांसाठी एक मोठी घोषणा केली.

Arvind Kejriwal (Photo Credit- Twitter)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज (3 जून) महिलांसाठी एक मोठी घोषणा केली. दिल्लीत महिलांना बस आणि मेट्रो प्रवास मोफत करता येईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली. या योजनेचा सर्व खर्च दिल्ली सरकार करणार असून यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत घेण्यात येणार नाही. या योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना मेट्रो आणि डीटीआर बस मधून मोफत प्रवास करता येईल.

ANI ट्विट:

तसंच 2-3  महिन्यात ही योजना लागू करण्याचा दिल्ली सरकारचा प्रयत्न असल्याचीही माहिती केजरीवाल यांनी दिली. याशिवाय महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिल्लीत 70 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. पुढील वर्षभरात दिल्लीत 3 हजार नव्या बसेस सुरु करण्याचाही केजरीवाल सरकारचा प्रयत्न आहे.

 

बस आणि मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 33% महिला आहेत. या आकडेवारीनुसार, दरवर्षी बससेवेवर सरकार सुमारे 200 कोटी रुपये खर्च करेल. तर मेट्रोतील महिलांच्या मोफत प्रवासासाठी दरवर्षी सुमारे एक हजार कोटींचा खर्च येईल.