Vijay Rupani | ANI

Vijay Rupani Dies In Plane Crash: गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एका भयानक विमान अपघाताने (Plane Crash) संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या अपघातात, एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान 787 अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच मेघानी नगरजवळील निवासी भागात कोसळले. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह 242 प्रवाशांपैकी बहुतेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आपले नेते, माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी हे त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी या विमानातून प्रवास करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो,' असे पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला रवाना झाले आहेत. (हेही वाचा - Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

दरम्यान, आज दुपारी 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह लंडन गॅटविकला जाणारे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान विमानतळाजवळील एका निवासी भागात कोसळले. सुरुवातीच्या अहवालात कोणीही वाचलेले नाही असे सांगण्यात आले होते, परंतु अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी नंतर एएनआयला सांगितले की, बचावकर्त्यांना सीट 11ए मध्ये एक जिवंत प्रवासी सापडला, ज्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.