Foreigner Wife-Desi Husband: नाद केला अंगाशी आला; फॉरेनची बायको मिळविण्याच्या नादात 5.78 लाख रुपयांना चुना, विवाहोत्सुक तरुणाला फटका

मैट्रीमोनियल साईट (Matrimonial Site) च्या माध्यमातून एका तरुणाची सायबर फसवणुक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी संबंधित युवकाची 5,78,000 रुपयांची फसवणूक केली.

Foreigner Wife-Desi Husband | (Photo Credit: Archived, edited, representative images)

विदेशी बायको (Foreigner Wife) करण्याच्या नादात एका विवाहोत्सूक तरुणाला चांगलाच झटका बसला आहे. मैट्रीमोनियल साईट (Matrimonial Site) च्या माध्यमातून एका तरुणाची सायबर फसवणुक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी संबंधित युवकाची 5,78,000 रुपयांची फसवणूक केली. तक्रार दाखल होताच सायबोर पोलीसांनी कारवाई करत फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये चिनोंतो रॉय अकाता, अजय, आतिफ अली यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. प्रकरणातील आरोपी चनोंतो रॉय अकाता हा नायजेरीयन आहे. सर्व आरोपी सध्या दिल्लीत राहत होते.

आरोपींनी एका मैट्रीमोनियल साईटच्या माध्यमातून तरुणाला आकृष्ट केले. त्याला विदेशी महिला पत्नी म्हणून मिळवून देण्याचे आमिष दाखवले. अमरीक असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो फरीदाबादचा राहणारा आहे. आरोपींनी त्याला 5,78,000 रुपयांना फसवले. अमरीक याची मैट्रीमोनियल साईटच्या माध्यमातून संगम नामक मुलीशी (आरोपी) ओळख झाली. या मुलीने संबंधित साईटवर प्रोफाईल इन्फोमध्ये ती नेदरलँड देशातील एम्स्टर्डैम शहरातील असल्याचे म्हटले होते. तिने तरुणाशी ओळख वाढवत जाळ्यात ओढले.

आरोपी तरुणीने तरुणास आपण त्याला भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे दर्शवले. थोड्या दिवसांनी तरुणीने तरुणास सांगितले की, लग्नासाठी आपण नेदरलँडवरुन 88 लाख रुपयांचे साहित्य घेऊन येत आहोत. मात्र, हे साहित्य एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. कस्टम अधिकारी म्हणून तरुणीच्या मित्राने फसवणूक झालेल्या अमरीक या तरुणाशी संवाद साधला. त्याला सांगितले की, नियमानुसार कराव्या लागणाऱ्या कागदोपत्री कारवाईसाठी 5,78,000 रुपयांचा खर्च येणार आहे. हे पैसे भरावे लागतील. यानंतर आरोपी तरुणीने तरुणास सांगितले की, माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत. त्यामुळे मला मदत कर. सध्या तू पैसे भर विमानतळाबाहेर आल्यानंतर मी तुला पैसे परत करेन. त्यानंतर तरुणाने तरुणीने दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरले.

दरम्यान, खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर आरोपी तरुणीने फोन बंद केला. वारंवार फोन करुनही तरुणीचा फोन बंद येऊ लागल्याने अमरीक याला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्याने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. पोलिस आयुक्त विकास आरोडा यांनी घटनेची दखल घेत तपास सुरु केला. पोलिसांच्या पथकाने आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून ताब्यात घेतले.