FlixBus Expands To South India: आता बेंगळुरू ते चेन्नई-हैदराबाद प्रवास अवघ्या 99 रुपयांमध्ये; दक्षिण भारतामध्ये सुरु झाली जर्मनीची फ्लिक्सबस सेवा

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील 33 शहरे आणि दक्षिण भारतातील 200 हून अधिक ठिकाणे जोडण्याची योजना आहे.

FlixBus in India (संग्रहित संपादित प्रतिमा)

FlixBus Expands To South India: जर्मन ट्रॅव्हल-टेक कंपनी फ्लिक्सबस इंडिया (FlixBus India) आता दक्षिण भारतात प्रवेश करत आहे. कंपनीने 3 सप्टेंबर रोजी याची घोषणा केली. याअंतर्गत 10 सप्टेंबरपासून बेंगळुरू ते चेन्नई आणि हैदराबादचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. यानंतर फ्लिक्सबसने कोईम्बतूर, मदुराई, तिरुपती, विजयवाडा आणि बेलगावी येथे सेवा देण्याची योजना आखली आहे. कंपनीने बेंगळुरू शहरातून 99 रुपये विशेष प्रमोशनल भाडे जाहीर केले आहे. याअंतर्गत 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत 99 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल आणि हे बुकिंग 10 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीतील प्रवासासाठी असेल.

फ्लिक्सबसने आतापर्यंत सहा बस ऑपरेटर्ससोबत भागीदारी केली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील 33 शहरे आणि दक्षिण भारतातील 200 हून अधिक ठिकाणे जोडण्याची योजना आहे. कंपनीची संपूर्ण देशात आपले जाळे सुरु करण्याची योजना अखात आहे. ती 101 शहरे आणि 215 थांबे जोडणार आहे.

उत्तर भारतात यश मिळवल्यानंतर फ्लिक्सबसने दक्षिण भारतात प्रवेशाची घोषणा केली तेव्हा फ्लिक्सबसचे सह-संस्थापक डॅनियल क्रॉस आणि सीओओ मॅक्स झ्यूमर यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी कंपनीने सांगितले की, फ्लिक्सबस स्थानिक बस ऑपरेटर्ससोबत आपली धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवेल. कंपनीने सांगितले की त्यांच्या ताफ्यातील बसेसमध्ये बीएस 6 इंजिन आहेत, याचा अर्थ प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ताफ्यातील प्रत्येक बसमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि सर्व आसनांवर 2-पॉइंट सीट बेल्ट आहेत, जे प्रवाशांना उच्च स्तरीय सुरक्षा आणि आराम प्रदान करतील.

(हेही वाचा: MSRTC Strike: राज्यातील ST Bus कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 50% पेक्षा जास्त बस डेपोवर परिणाम; महसुलाचे मोठे नुकसान, मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक)

दरम्यान, फ्लिक्सबस देशात आल्यानंतर हजारो भारतीयांना अनेक सोयीस्कर, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. नवी दिल्ली, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील शहरे आणि मार्ग सेवेमध्ये जोडले गेले आहेत. आता दक्षिण भारतामधील शहरे या बससेवेद्वारे जोडली जातील.