Fem Lesbian Couple Ad: अखेर Dabur ने मागे घेतली लेस्बियन जोडप्याची Karwa Chauth ची जाहिरात; मागितली जाहीर माफी

ही बाब गंभीर असल्याचे मंत्री म्हणाले होते

Fem Lesbian Couple Ad (संग्रहित संपादित प्रतिमा)

डाबर (Dabur) कंपनीने नुकतीच आपली वादग्रस्त फेम ब्लीच जाहिरात (Fem Advertisement) मागे घेतली आहे. या जाहिरातीबाबत सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती, त्यानंतर कंपनीने ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. डाबरच्या या जाहिरातीत एका लेस्बियन जोडप्याला (Lesbian Couple) करवा चौथ (Karva Chauth) साजरी करताना दाखवण्यात आले होते. ही जाहिरात पाहून लोक संतापले व त्यांनी याबाबत आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी मध्य प्रदेश सरकारकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती.

खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेत कारवाईबाबत भाष्य केले होते. इतक्या मोठ्या गदारोळानंतर आता डाबर कंपनीने ही जाहिरात काढून टाकत आहे. यासोबतच लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल कंपनीने माफीही मागितली आहे. डाबर कंपनीने मंगळवारी एक निवेदन जारी करून जाहिरात मागे घेतल्याची माहिती दिली. कंपनीने ट्विट करत सांगितले की, ‘सर्व सोशल मीडिया हँडलवरून फेम करवा चौथ जाहिरात मागे घेतली जात आहे आणि अनावधानाने लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो'.

यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये कंपनीने लिहिले की, 'डाबर आणि फेम समानता आणि विविधतेच्या समावेशावर विश्वास ठेवतात. आम्हाला याचा अभिमान आहे, परंतु आम्ही हे देखील समजतो की प्रत्येकजण आमच्याशी सहमत होऊ शकत नाही. आम्ही मतभेदाचा आदर करतो आणि कोणाच्याही श्रद्धा, भावना, परंपरा आणि धार्मिक मूल्यांचा अनादर करण्याचा आमचा हेतू नाही.’ (हेही वाचा: Same Sex Marriage: 'भारतात केवळ जैविक पुरुष आणि जैविक स्त्री यांच्यातीलच विवाहाला परवानगी, समलिंगी विवाह मान्य नाही'- केंद्र)

दरम्यान, ही जाहिरात तात्काळ हटवण्याची मागणी करत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी डीजीपींना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. ही बाब गंभीर असल्याचे मंत्री म्हणाले होते. तसेच डाबरने करवा चौथ साजरी करणाऱ्या समलिंगी जोडप्याची जाहिरात मागे न घेतल्यास डाबरवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री मिश्रा यांनी दिला होता.