Fastest Covid-19 Vaccinating Country: अमेरिकेला मागे टाकून भारत बनला जगात सर्वात वेगाने कोरोना लसीकरण करणारा देश; आतापर्यंत 8.70 कोटी पेक्षा जास्त डोस दिले
यापैकी 30,08,087 लाभार्थ्यांना प्रथम डोस म्हणून ही लस देण्यात आली, तर 3,29,514 लाभार्थ्यांना लसचा दुसरा डोस देण्यात आला
कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा सामना करण्यासाठी सध्या भारतासह अनेक देशांमध्ये लसीकरण (Vaccination) सुरु आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारताने आपला लसीकरणाचा वेग वाढविला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, कोविड-19 विरोधी लसीकरणात अमेरिकेला मागे टाकून, भारत जगातील सर्वात वेगाने लसीकरण करणारा देश बनला आहे. भारतात लसीचे दररोज सरासरी 30,93,861 डोस दिले जात आहेत. आतापर्यंत देशात कोविड-19 लसीचे 8.70 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एकूण 13,32,130 सत्रांमध्ये लसीचे 8,70,77,474 डोस देण्यात आले आहेत.
6 एप्रिल रोजी लसीचे एकूण 33,37,601 डोस देण्यात आले. यापैकी 30,08,087 लाभार्थ्यांना प्रथम डोस म्हणून ही लस देण्यात आली, तर 3,29,514 लाभार्थ्यांना लसचा दुसरा डोस देण्यात आला. या व्यतिरिक्त पहिला डोस 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 3,53,75,953 लोकांना आणि दुसरा डोस याच वयोगटातील 10,00,787 लोकांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर, 45 ते 60 वर्षे दरम्यानच्या 2,18,60,709 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 4,31,933 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील लसीकरण मोहिमेच्या 81 व्या दिवशी (6 एप्रिल) 33,37,601 लोकांना डोस देण्यात आले. (हेही वाचा: 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 12.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा IMF चा अंदाज; चीनलाही टाकणार मागे)
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1.15 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक महामारीच्या प्रारंभापासून आजपर्यंतची ही सर्वात जास्त एका दिवसात आढळलेली प्रकरणे आहेत. अशाप्रकारे देशातील एकूण संक्रमितांची संख्या 1,28,01,785 वर पोहोचली आहे. संसर्गाच्या नव्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा वाटा 80.70 टक्के आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 55,469 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना लसीचे केवळ 14 लाख डोसच शिल्लख आहेत. केंद्र सरकारने लसीचे पुढील डोस वेळेत पाठवले नाहीत तर राज्यातील लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.