Faridabad: जखमी झालेल्या गायीवर शस्त्रक्रिया; पोटातून निघाले 71 किलो प्लास्टिक, सुया, नाणी, दगड आणि खिळे
डॉक्टरांनी सांगितले की, गायींसारख्या प्राण्यांच्या पोटाची रचना फार गुंतागुंतीची आहे. त्यात कोणतीही बाहेरील वस्तू राहिल्यास ती पोटाला चिकटते. हळूहळू तिथे हवा जमा होण्यास सुरवात होते
शासनाने अनेक प्रयत्न करूनही पॉलिथिन म्हणजेच प्लास्टिकचा (Plastic) वापर थांबलेला नाही. हेच कारण आहे की, यामुळे पर्यावरणाबरोबरच पशु-पक्षीही त्याचा त्रास सहन करीत आहेत. नुकतेच हरियाणाच्या फरीदाबाद (Faridabad) जिल्ह्यात अपघातामध्ये जखमी झालेल्या एका गायीची (Cow) शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी या मुक्या प्राण्याच्या पोटातून 71 किलोहून अधिक पॉलिथीन बाहेर काढण्यात आले. यासह गायीच्या पोटात इतरही कचरा आढळला आहे. गाईच्या पोटातून प्लास्टिक, सुया, नाणी, दगड आणि खिळे बाहेर पडले आहेत. फरीदाबाद येथे एनआयटी-5 गाडीने गायीला धडक मारली होती.
त्यानंतर या गायीला देवश्रय पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांच्या लक्षात आले की गाय वारंवार तिच्या पोटावर लाथा मारत आहे. डॉक्टरांना वाटले तिच्या पोटात दुखत असावे मात्र नंतर एक्सरे आणि अल्ट्रासाऊंड तपासणीनंतर तिच्या पोटात हानिकारक गोष्टी असल्याची पुष्टी झाली. हॉस्पिटलचे डॉ.अतुल मोर्य यांच्या म्हणण्यानुसार, गायीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, परंतु अद्याप तिच्यावरील धोका टळला नाही. पुढील 10 दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. डॉ अतुल हे सात वर्षाच्या गायीवर शस्त्रक्रिया करणार्या तीन-सदस्यांच्या टीमचे सदस्य होते. (हेही वाचा: उत्तराखंड दुर्घटनेनंतर 18 व्या दिवशीही शोध व बचावकार्य सुरु; आतापर्यंत 70 मृतदेह सापडले, 130 पेक्षा जास्त लोक अजूनही Missing)
गायीच्या पोटाचे चार भाग साफ करण्यास सुमारे चार तसले लागले, ज्यामध्ये मुख्यत्वे प्लास्टिक होते. डॉक्टरांनी सांगितले की, गायींसारख्या प्राण्यांच्या पोटाची रचना फार गुंतागुंतीची आहे. त्यात कोणतीही बाहेरील वस्तू राहिल्यास ती पोटाला चिकटते. हळूहळू तिथे हवा जमा होण्यास सुरवात होते, यामुळे प्राण्याच्या पोटात वेदना होतात आणि ते पोटाला लाथा मारू लागतात. दरम्यान, हरियाणा हे असे एक राज्य आहे जेथे 2021 मध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली गेली होती. याशिवाय राज्य सरकार गायींच्या हितावरही भर देते.