Hero MotoCorp चे अध्यक्ष Pawan Munjal यांच्या घरी ED ची छापेमारी

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कारवाई करताच कंपनीच्या समभागांवर मोठा परिणाम झाला आणि त्यात घट झाली.

ED

हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीचे आध्यक्ष पवन मुंजाल (Pawan Munjal) याच्या निवास्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कारवाई करताच कंपनीच्या समभागांवर मोठा परिणाम झाला आणि त्यात घट झाली. अंमलबजावणी संचालनालयाने, दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील त्याच्या परिसराची झडती घेतली आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला, असे पीटीआयने वृत्तसंस्थेने वृत्त दिले. महसूल गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ईडीने कारवाई केली. डीआरआयने पवन मुंजालच्या जवळच्या साथीदाराला मोठ्या प्रमाणात अघोषित विदेशी चलनासह विमानतळावर पकडले होते.

आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीप्रकरणी मार्च 2022 मध्ये Hero Motorcorp च्या कार्यालयांची झडती घेतली होती. आयकर विभागाने कंपनीचे अध्यक्ष मुंजाल यांच्या घराचीही झडती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आयकर विभागाने कारवाई केल्याची बातमी बाहेर पडताच कंपनीच्या शेअर्समध्ये 3% इतकी घसरण झाली. दुपारी 1 वाजता BSE वर कंपनीचे शेअर्स 3.45% कमी होऊन प्रत्येकी ₹3092.90 वर व्यवहार करत होते. आज बीएसईवर प्रत्येकी ₹3,242.85 या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर समभाग घसरले. Hero Motocorp चे शेअर मूल्य 13.36% YTD आणि गेल्या वर्षी 8.42% ने वाढले आहे. Hero Motorcorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. गेल्या दोन दशकांत तिचे जागतिक पातळीवरचे अस्तित्व मजबूत झाले आहे. सध्या, ती आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 40 देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.

करचोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणांशी लढा देण्यासाठी, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 मध्ये लागू करण्यात आला. हा कायदा सरकार किंवा सार्वजनिक प्राधिकरणाला बेकायदेशीरपणे कमावलेल्या स्त्रोतांमधून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्यास सक्षम करतो. बेकायदेशीररीत्या कमावलेल्या पैशाचे वैध पैशात रूपांतर करण्याच्या सर्रास चाललेल्या प्रथेला आळा घालणे हा या कायद्याचा उद्देश आहे. जर एखादी व्यक्ती मनी लाँड्रिंगमध्ये दोषी आढळली तर त्याला तीन ते सात वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. दोषी व्यक्तीलाही दंड भरावा लागेल.