नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार ई-लिलाव, मौल्यवान 112 वस्तू विकून केली जाणार वसुली; पेंटिंग्ज, घड्याळे, कार्स, हँडबॅग्ज यांचा समावेश
विविध बँकांच्या थकबाकी वसुली संदर्भात ही संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे
पीएनबी घोटाळ्यातील (PNB Sacm) कथित आणि फरार आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याच्या 112 मालमत्तांचा थेट लिलाव (Auction), 27 फेब्रुवारीपासून होणार आहे. विविध बँकांच्या थकबाकी वसुली संदर्भात ही संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. या मालमत्ता विकून काही प्रमाणात वसुली करण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांच्या लिलाव प्रक्रियेत महत्त्वाच्या कलाकृती, मौल्यवान घड्याळे आणि हँडबॅग्ज तसेच नीरव मोदी याच्या मालकीच्या दोन मोटारींचा समावेश असेल. यावेळी प्रसिद्ध कलाकार एम.एफ. हुसेन आणि अमृता शेरगिल यांची पेंटिंग्ज, रोल्स रॉयस घोस्ट आणि पोर्श पनामरा यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
पहिला लिलाव गुरुवारपासून सॅफरनआर्ट नावाच्या कंपनीतर्फे, स्प्रिंट लाइव्ह लिलावात होणार आहे. या ऑनलाईन लिलावाचा पुढील टप्पा मार्च 3-4 मध्ये आयोजित केला जाईल. लिलाव होणार असलेल्या पेंटींग्जमध्ये शेरगिलच्या 'बॉईज विथ लेमन' आणि ‘Battle of Ganga and Jamuna: Mahabharata’ या चित्रांचा समावेश आहे. शेरगिल यांनी 1935 साली आपले हे प्रसिद्ध पेंटिंग बनवले होते , तर हुसेन यांचे काम 1972 मधील आहे.
असे मानले जात आहे की, या दोन्ही पेंटिंग्जवर 12-18 कोटी रुपयांपर्यंत बोली लागू शकते. शेरगिल यांचे पेंटिंग पहिल्यांदा सार्वजनिक बोलीसाठी ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे व्ही.एस. गायतोंडे यांच्या अज्ञात पेंटिंगद्वारे सात-नऊ कोटी रुपये मिळू शकतील, जे त्यांनी 1972 साली बनवले होते. राजा रवि वर्मा यांच्या अज्ञात पेंटिंगची किंमत दोन ते तीन कोटी रुपये असू शकते आणि अर्पिता सिंग यांनी 1996 साली बनवलेल्या 'ट्वेंटी सेवन डक्स ऑफ मेमोरी' साठी 1.20 ते 1.80 कोटींची बोली लागू शकते. गणेश पाइन, केके हेब्बर, विश्वनाथ नागेशकर, सुधांशु चौधरी आणि शान भटनागर यांच्या पेंटिंग्जसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागू शकते. (हेही वाचा: 'नीरव मोदी'च्या Ostrich Hide Jacket लूकची सोशल मीडियात चर्चा, 8-10 लाखाच्या या जॅकेट्समध्ये असं नेमकं काय आहे?)
रोल्स रॉयस घोस्ट कार थेट लिलावात ठेवण्यात येईल. या गाडीत अनेक वैशिष्ट्ये, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरामदायक सुविधा आहेत. त्याची बोली 75-95 लाखांपर्यंत असू शकते. त्याचप्रमाणे 2010 च्या मॉडेल पोर्श पानमारासाठी 10 ते 15 लाखांची बोली लागू शकते. याशिवाय कोट्यवधी किंमतीच्या दोन डझन लक्झरी वस्तूंचा लिलावही करण्यात येणार आहे.