Coronavirus: कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ; उत्तरप्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये सर्वाधिक तक्रारी

यामुळे एकीकडे या विषाणूचा प्रसार कमी होण्यास मदत होत आहे, तर दुसरीकडे भारतात घरगुती हिंसाचाराच्या

Domestic violence, प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे संपूर्ण भारतात लॉक डाउन (Lockdown) चालू आहे. यामुळे एकीकडे या विषाणूचा प्रसार कमी होण्यास मदत होत आहे, तर दुसरीकडे भारतात घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये सर्वाधिक घरगुती हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. 24 मार्चच्या लॉकडाऊनपासून आयोगाकडे एकूण 250 तक्रारी आल्या असून, त्यापैकी 69 तक्रारी घरगुती हिंसाचाराच्या आहेत. दिल्लीच्या डीसीपी यांनी सांगितल्या प्रमाणे, याआधी त्यांना घरगुती हिंसाचार, छेडछाडीशी संबंधित दररोज 900-1000 कॉल येत होते, मात्र लॉकडाउननंतर सुमारे 1000-1200 कॉल येत आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार 23 मार्च 2020 ते 1 एप्रिल या कालावधीत महिलांकडून सायबर गुन्हेगारीच्या 15 तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर महिलांशी घरगुती हिंसाचाराच्या 69 तक्रारी आल्या आहेत. त्याचप्रमाणे, बलात्काराच्या किंवा बलात्काराच्या प्रयत्नांच्या 13 तक्रारी, त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराविषयी 77 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महिलांनी एकूण 257 तक्रारी दाखल केल्या असून, त्यापैकी 237 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा: घरगुती हिंसाचाराचा खटला सुरु असताना महिलेला सासरचे कुटुंब घराबाहेर काढू शकत नाहीत; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय)

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 'लॉक डाऊनमुळे  घरगुती हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, परंतु पती सतत घरातच असल्याने महिला तक्रार करण्यास घाबरतात. महिला पोलिसांशी संपर्क साधण्यास असमर्थ आहेत, कारण त्यांना त्यांच्या पतीची भीती वाटत आहे. याआधी असे काही घडल्यास त्या त्यांच्या माहेरी जात असत मात्र आता तो मार्गही बंद आहे.' अखिल भारतीय प्रगतशील महिला संघटनेच्या सेक्रेटरी कविता कृष्णन म्हणाल्या की, ‘सरकारने जर लॉक डाऊनचा आधी इशारा दिला असता किंवा माहिती दिली असती तर अशा महिला आधीच सुरक्षित ठिकाणी जाऊ शकल्या असता. मात्र हे सर्व अचानक घडल्याने आता त्या उघडपणे तक्रारही करू शकत नाहीत.’