Diwali 2020: जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी साजरी केली दिवाळी; प्रज्वलित केले दिवे, फोडले फटाके (Watch Video)
अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते. फटाके, दिवे, फराळ, पूजा, आकाशकंदील असा दिवाळीचा थाट असतो.
सध्या देशात सर्वत्र दिवाळीची (Diwali 2020) धामधूम सुरु आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते. फटाके, दिवे, फराळ, पूजा, आकाशकंदील असा दिवाळीचा थाट असतो. या सणाला लोक आपापल्या घरी परतात. जेव्हा देशातील लोक आनंदाने दिवाळी साजरी करत असतात, तेव्हा देशाच्या सीमेवर सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत असतो. अशावेळी प्रत्येकवर्षीच भारतीय सीमेवर दिवाळी साजरी होते. आताही जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी आरएस पुरामध्ये दिवाळी साजरी केली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
जम्मू-कश्मीरमधील आर.एस.पुरामध्ये सीमाभागातील सुरक्षा दलाच्या जवानांनी दिवे प्रज्वलित करून, फटाके फोडून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एक जवान म्हणाला, ‘शत्रूची नजर आपल्या देशावर पडू नये म्हणून आम्ही सावधगिरीने आपले कर्तव्य बजावत आहोत. आम्ही आपापल्या कुटुंबाला आठवून आपल्या बीएसएफ परिवारासह दिवाळी साजरी करीत आहोत. लोक आपापल्या घरी दिवाळीचा आनंद घेतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही येथे आहोत.’
कोरोना विषाणूचे सावट असूनही देशात दिवाळीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होत आहे. या सणाचे औचित्य साधून देशातील विविध शहरांमध्ये मोठी रोषणाई करण्यात आली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी देशातील जनतेला आवाहन करत सांगितले की, ही दिवाळी सैनिकांच्या सन्मानार्थ साजरी करण्यात यावी. पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, या दिवाळीत, सैनिकांच्या सन्मानार्थ दीप प्रज्वलित करूया. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला केले आवाहन; म्हणाले - 'या दिवाळीत सैनिकांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करूया दिवे')
दरम्यान, एकीकडे देश दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे आज शुक्रवारी पहाटे पाक सैन्याच्या पथकाने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. इथे तैनात केलेल्या जवानांनी यावर त्वरित कारवाई केली आणि त्यांच्यातील तीन कमांडो मारले. त्यांनतर कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार आणि नौगम सेक्टरांव्यतिरिक्त बांदीपुरातील गुरेझ येथे पाक सैन्याने भारतीय सैन्य आणि नागरी तळांवर गोळीबार केला. या हल्यात भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत.